आज पुरुषांची फ्रान्सशी आणि महिलांची कॅनडाशी लढत

नावाजलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्या नेतृत्वाखालील भारताचा युवा बॅडमिंटन चमू रविवारी थॉमस आणि उबेर चषकातील पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. महिलांच्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणारी पी. व्ही. सिंधू आणि अनुभवी किदम्बी श्रीकांत यांच्या अनुपस्थितीत सायना व प्रणॉय यांच्यावरच जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची मुख्य मदार आहे.

प्रणॉयशिवाय सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता बी. साईप्रणीत, स्विस स्पर्धेचा विजेता समीर वर्मा आणि कनिष्ठांच्या जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असणारा लक्ष्य सेन यांच्याकडून पुरुष एकेरीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पुरुष दुहेरीत राष्ट्रीय विजेती जोडी मनू अत्री आणि बी. सुमित व अर्जुन एम. आर. आणि श्लोक रामचंद्रन हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुरुष दुहेरीतील राष्ट्रकुल रौप्यपदक विजेती जोडी चिराग शेट्टी आणि सात्त्विक रंकीरेड्डी यांनासुद्धा या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

पुरुषांमध्ये भारताचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला असून, त्यांच्यासमोर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि चीन यांचे कडवे आव्हान असणार आहे. भारताचा पहिला सामना रविवारी फ्रान्स संघाशी होणार आहे.

महिलांमध्ये भारताचा कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्यासह ‘अ’ गटात समावेश आहे. एकेरीत १६ वर्षीय वैष्णवी जक्का रेड्डी, साई कृष्णा प्रिया आणि अनुरा प्रभू देसाई यांच्यावर मदार आहे, तर दुहेरीमध्ये प्राजक्ता सावंत आणि संयोगिता घोरपडे, पूर्विशा राम आणि मेघना जे. यांना शानदार कामगिरी करावी लागणार आहे. भारताचा पहिला सामना रविवारी कॅनडाशी होणार आहे.

पुरुष : भारत वि. फ्रान्स

  • वेळ : सकाळी ७:३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

महिला : भारत वि. कॅनडा

  • वेळ : दुपारी १२:३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २