टिम साऊदी हा सध्याच्या न्यूझीलंड संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याची स्विंग गोलंदाजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांना त्रास देत आहे. न्यूझीलंडचा हा विशेषज्ञ गोलंदाज फलंदाजी करतानाही मोठ्या दिग्गजांना आव्हान देत आहे. कसोटी क्रिकेटमधील षटकारांचा विचार करायचा झाला, तर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, रोहित शर्मा, रिकी पॉन्टिंग, एबी डिव्हिलियर्स यांच्याआधी  साऊदीचे नाव येते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडसाठी पहिल्या डावात साऊदीने २ षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाचा महान माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकले. आता तो लवकरच धोनीलाही मागे टाकू शकेल. ३२ वर्षीय साऊदीने पहिल्या डावात ४६ चेंडूत ३० धावा केल्या. साऊदीच्या खात्यात आता ७५ कसोटी षटकार आहेत. या सामन्यापूर्वी साऊदी आणि पाँटिंगला प्रत्येकी ७३ षटकारांसह बरोबरीत होते.

 

टिम साऊदीने ७९ कसोटी सामन्यांमध्ये ७५ षटकार लगावले आहेत. सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत आता तो अव्वल १५ फलंदाजांमध्ये दाखल झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. त्याने १०१ सामन्यांत १०७ षटकार ठोकले आहेत. ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलख्रिस्ट १०० षटकारांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

साऊदीच्या रडारवर आता महेंद्रसिंह धोनी

सर्वाधिक षटकारांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी ७८ षटकारांसह १४व्या स्थानावर आहे. टिम साऊदीचे लक्ष्य आता धोनी आहे. धोनीला मागे टाकण्यासाठी त्याला फक्त ४ षटकारांची गरज आहे. कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत भारतीय क्रिकेटपटूंमध्ये वीरेंद्र सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १०४ सामन्यात ९१ षटकार ठोकले आहेत. जगातील सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत मॅक्युलम, गिलख्रिस्ट, ख्रिस गेल आणि जॅक कॅलिसच्या नंतर सेहवाग पाचव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – WTC FINAL : दोन भारतीय प्रेक्षकांना काढले स्टेडियमबाहेर, जाणून घ्या कारण

भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकीर्दीत ६९ षटकार ठोकले आहेत. त्याचप्रमाणे सौरव गांगुलीचे कसोटी क्रिकेटमध्ये ५७ षटकार आहेत. सध्याच्या टीम इंडियाच्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा ५९ षटकारांसह आघाडीवर आहेत. विराट कोहलीच्या नावावर २२ षटकार आहेत.