करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका जगभरातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. टेनिसमध्ये मानाचं स्थान असलेली विम्बल्डन स्पर्धा करोना विषाणूमुळे रद्द करण्यात आलेली आहे. तब्बल ७५ वर्षांनी पहिल्यांदाच ही स्पर्धा रद्द करण्यात आलेली आहे. दरम्यान सध्याच्या काळात जगभरातील वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर करोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी झटत आहेत. विम्बल्डनने या सर्व हिरोंचा सन्मान करण्यासाठी एक व्हिडीओ बनवला आहे, रॉजर फेडररने या व्हिडीओला आपला आवाज दिला आहे. २९ जुन ते १२ जुलै दरम्यान यंदाच्या हंगामातली विम्बल्डन स्पर्धा खेळवली जाणार होती.

या व्हिडीओत विम्ब्लडनची जुनी परंपरा, प्रेक्षकांचा सामन्यांना मिळणारा प्रतिसाद…रात्रीपर्यंत चालणारे सामने याबद्दल फेडरर बोलताना दाखवला आहे. मात्र यंदा ही स्पर्धा होत नसली तरीही जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आम्ही पाठीशी आहोत…उद्याचा दिवस आजच्यापेक्षा अधिक चांगला असेल या आशेवर आम्ही सर्व एकत्र आहोत, अशा शब्दांमध्ये फेडररने सर्वांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, यंदाच्या हंगामातली विम्बल्डन स्पर्धा रद्द झालेली असली तरीही फ्रेंच खुली स्पर्धा आणि क्ले कोर्ट हंगाम सप्टेंबरमध्ये होऊ शकेल, असा विश्वास व्यावसायिक टेनिस संघटनेचे (एटीपी) प्रमुख आंद्रेआ गॉडेन्झी यांनी व्यक्त केला. ‘‘ऑगस्टमध्ये जर टेनिसचा हंगाम सुरू झाला तर उर्वरित कालावधीत तीन ग्रँडस्लॅम पूर्ण करता येतील. सहा मास्टर्स स्पर्धाही खेळवणे अपेक्षित आहे. ऑगस्टमधील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर क्ले कोर्टवर चार आठवडय़ांचे टेनिस होऊ शकेल. या स्थितीत सप्टेंबरमधील फ्रेंच खुल्या स्पर्धेआधी माद्रिद आणि रोम या क्ले कोर्टवरील स्पर्धा होऊ शकतात,’’ असे गॉडेन्झी यांनी म्हटले.