लुकासच्या हॅट्ट्रिकमुळे आयएक्सवर ३-२ अशी मात करत अंतिम फेरीत धडक; विजेतेपदासाठी आता लिव्हरपूलशी लढत

अ‍ॅमस्टरडॅम : फुटबॉलच्या इतिहासात दमदार पुनरागमन करणाऱ्या लिव्हरपूलच्या कामगिरीला २४ तास उलटत नाहीत, तोच टॉटनहॅमनेही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत तीन गोलची पिछाडी भरून काढली आणि आयएक्सवर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ३-२ असा विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. लुकास मौरा याने झळकावलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर टॉटनहॅमने ३-३ अशा एकूण गोलफरकाच्या आधारावर (प्रतिस्पध्र्याच्या गृहमैदानावर केलेले अधिक गोल) आयएक्सला धूळ चारत विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.

उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात आयएक्सने टॉटनहॅमला १-० असे पराभूत केले होते. त्यातच अ‍ॅमस्टरडॅम येथे बुधवारी रात्री रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात आयएक्सने पहिल्या सत्रातच दोन गोल करत आपली एकूण आघाडी ३-० अशी वाढवली होती. मॅथिस डे लाइट याने पाचव्या मिनिटालाच हेडरद्वारे गोल करत आयएक्सचे खाते खोलले होते. त्यानंतर हकिम झायेच याने ३५व्या मिनिटाला आयएक्सच्या खात्यात दुसऱ्या गोलाची भर घातली होती. आयएक्सने मोठी आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.

प्रशिक्षक मॉरिसियो पोशेटिनो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या टॉटनहॅमने मात्र हार मानली नव्हती. दुसऱ्या सत्रात ५५व्या मिनिटाला लुकासने पहिला गोल झळकावल्यानंतर चार मिनिटांनी त्याने दुसरा गोल लगावत टॉटनहॅमला या सामन्यात पुनरागमन करून दिले. सामना संपायला अवघ्या काही सेकंदांचा अवधी शिल्लक असताना लुकासने डेले अलीने पास दिलेल्या चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि आयएक्सचा गोलरक्षक आंद्रे ओनाना याला चकवून विजयी गोल लगावत आपली हॅट्ट्रिक साजरी केली. चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक लगावणारा लुकास मौरा हा पाचवा फुटबॉलपटू ठरला. अंतिम क्षणी गोल केल्यानंतर टॉटनहॅमच्या खेळाडूंनी तसेच चाहत्यांनी विजयोत्सव साजरा केला. आता १ जून रोजी माद्रिद येथे रंगणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत टॉटनहॅमला लिव्हरपूलशी लढत द्यावी लागेल.

२०१९च्या चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी ही युरोपियन फुटबॉलच्या इतिहासातील दोन इंग्लिश संघांचा समावेश असलेली तिसरी अंतिम फेरी असणार आहे.

टॉटनहॅम हॉटस्पर हा चॅम्पियन्स लीगच्या इतिहासातील दुसरा असा संघ आहे, ज्याने उपांत्य फेरीच्या घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात पराभूत होऊनही अंतिम फेरीत धडक मारली आहे.

चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारणारा टॉटनहॅम हॉटस्पर हा आठवा इंग्लिश संघ ठरला आहे. अर्सेनल, अ‍ॅस्टन व्हिला, चेल्सी, लीड्स युनायटेड, मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल आणि नॉटिंगहॅम फॉरेस्ट या संघांनी याआधी अंतिम फेरीत मजल मारली आहे.

चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत गोल झळकावणारा आयएक्सचा बचावपटू मॅथिस डे लाइट हा चौथा युवा खेळाडू ठरला आहे. याआधी नॉर्डिन वूटर (आयएक्स, १९९६), ओबाफेमी मार्टिन्स (इंटर मिलान २००३) आणि किलियान एम्बाप्पे (मोनॅको, २०१७) यांनी ही करामत केली आहे.