|| देवेंद्र पांडे

प्रशासकीय समितीकडे क्रिकेटपटूंच्या तीन मागण्या

इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या मागण्यांची यादीच प्रशासकीय समितीकडे सादर केली आहे. विमानापेक्षा रेल्वेने प्रवास आणि तेही शक्य झाले नाही तर बसने प्रवास, पत्नीची सोबत आणि केळी, अशा मागण्या भारतीय खेळाडूंनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडे केल्या आहेत.

इंग्लंड दौऱ्यात आपल्या पसंतीची फळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने उपलब्ध करून न दिल्यामुळे खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बीसीसीआयच्या खर्चाने आमच्यासाठी केळी उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे. त्याचबरोबर हॉटेलचे बुकिंग करताना अद्ययावत जिम असावी तसेच किती वेळ हॉटेलमध्ये राहावे लागणार आहे, याची माहिती आणि पत्नी सोबत असताना शिष्टाचाराविषयीची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, अशीही मागणी खेळाडूंनी केली आहे.

वेळ वाचावा यासाठी आम्हाला ट्रेनने प्रवास करून द्यावा, या खेळाडूंनी केलेल्या दुसऱ्या मागणीने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाचेच डोळे विस्फारले आहेत. ‘‘ट्रेनचा प्रवास आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे. सुरक्षेची काळजी म्हणून प्रशासकीय समितीने सुरुवातीला खेळाडूंची ही मागणी मान्य केलेली नाही. पण इंग्लंड संघही ट्रेनने प्रवास करतो, हे कोहलीने प्रशासकीय समितीच्या लक्षात आणून दिले आहे,’’ असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.

संपूर्ण दौऱ्यासोबत पत्नीची सोबत असावी, या खेळाडूंच्या तिसऱ्या मागणीवर बरेच चर्वितचर्वण झाले. संपूर्ण दौऱ्यादरम्यान पत्नी सोबत असल्यास, सामन्याव्यतिरिक्त आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल तसेच मनावरील ताणही कमी करता येईल, त्यामुळे पत्नीची सोबत असायला हवी, अशी मागणी कर्णधार विराट कोहलीने केली होती. मात्र ही मागणी मान्य करण्याआधी प्रशासकीय समिती सर्व खेळाडूंची लेखी संमती घेणार आहे.