ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसह रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार असून, या रिक्त जागेकरिता सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अनिल कुंबळे किंवा व्हीव्हीएस लक्ष्मण या पर्यायांचा गांभीर्याने विचार करीत आहे.

२०१६-१७ मध्ये सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने संघ संचालक शास्त्री यांच्या जागी कुंबळे यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. परंतु कर्णधार विराट कोहलीशी संघर्षामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर कुंबळे यांनी पदाचा राजीनामा दिला. परंतु आता कुंबळे यांचा पुन्हा प्रशिक्षकपदासाठी विचार केला जात आहे. याशिवाय ‘आयपीएल’मधील सनरायजर्स हैदराबादचे मार्गदर्शक लक्ष्मणसुद्धा या शर्यतीत अग्रेसर आहेत. या दोन्ही खेळाडूंकडे १००हून अधिक कसोटी सामन्यांचा अनुभव आहे.

‘‘कोहलीच्या दडपणामुळे क्रिकेट सल्लागार समितीला कुंबळे यांचा राजीनामा स्वीकारून शास्त्री यांची वर्णी लावावी लागली होती. आता कुंबळे किंवा लक्ष्मण प्रशिक्षकपदासाठी इच्छुक आहेत का, हाच प्रश्न उरतो’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली. नुकतीच कोहलीने ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली.

धोनीचे मार्गदर्शन गोलंदाजांसाठी फायदेशीर – सेहवाग

नवी दिल्ली : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीला गोलंदाजांचा कर्णधार म्हणता येईल. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची मार्गदर्शकाची भूमिका बुमरासह गोलंदाजीच्या फळीसाठी फायदेशीर ठरेल, असे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सांगितले. ‘‘धोनीने भारतीय क्रिकेटच्या मुख्य स्रोतात असावे, असे बऱ्याच जणांना वाटत होते. ‘बीसीसीआय’ने त्याच्याकडे मार्गदर्शकाची भूमिका सोपवण्याचे सर्वोत्तम कार्य केले आहे. यष्टिरक्षक म्हणून क्षेत्ररक्षण रचनेतही धोनी पारंगत आहे,’’ असे सेहवाग म्हणाला.