राष्ट्रीय सराव शिबिरात भारतीय महिला बॉक्सिंगपटूंसोबत काम करणाऱ्या दोन साहाय्यक प्रशिक्षकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र तरीही इंदिरा गांधी बंदिस्त स्टेडियममधील सराव शिबीर सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक सी.ए. कुट्टप्पा यांच्यासहित पतियाला येथील पुरुष संघातील १० बॉक्सिंगपटूंना गेल्या आठवड्यात करोनाची बाधा झाली होती. आता दोन साहाय्यक प्रशिक्षकांना करोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यासोबत सराव करणाऱ्या काही खेळाडूंचीही चाचणी करण्यात आली असून त्याचे अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे.

‘‘काही खेळाडूंची प्रकृती बिघडली आहे, मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचा त्यात समावेश नाही,’’ असेही सूत्रांनी सांगितले. टोक्यो ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत पाच पुरुष आणि चार महिला बॉक्सिंगपटू पात्र ठरले असून २१ ते ३१ मेदरम्यान नवी दिल्ली येथे रंगणाऱ्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ते सहभागी होणार आहेत.