प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली १९ वर्षाखालील भारतीय संघ रविवारी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. उपांत्य फेरीत पाकिस्तानवर मात करत भारताने अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं. अंतिम फेरीत भारतासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. बांगलादेशने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडवर मात केली. भारतीय संघ एकही सामना न गमावता अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहचला आहे. यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी, प्रियम गर्ग, रवी बिश्नोई, अथर्व अंकोलेकर यासारखे तरुण खेळाडू आतापर्यंतच्या सामन्यांच चमकले आहेत. मात्र अंतिम सामन्यात मुंबईचा यशस्वी जैस्वाल हा बांगलादेशसाठी खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरु शकतो.
विश्वचषकात आतापर्यंतच्या सामन्यात यशस्वी जैस्वालने अष्टपैलू खेळ केला आहे. फलंदाजीत त्याची कामगिरी सर्वोत्तम आहेच, मात्र यशस्वीने गरजेच्या वेळेला गोलंदाजीतही आपलं कौशल्य दाखवत काही महत्वाचे बळी मिळवले आहेत. २०२० विश्वचषक स्पर्धेतील यशस्वी जैस्वालच्या कामगिरीवर एक नजर टाकूयात…
फलंदाजी –
विरुद्ध श्रीलंका – ५९ धावा
विरुद्ध जपान – २९ धावा*
विरुद्ध न्यूझीलंड – ५७ धावा*
विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ६२ धावा
विरुद्ध पाकिस्तान – १०५ धावा*
आतापर्यंतच्या ५ सामन्यांमध्ये यशस्वीच्या नावावर ३१२ धावा जमा असून यात ३ अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ५ पैकी ३ डावांत यशस्वी नाबाद राहिला आहे. याव्यतिरीक्त गोलंदाजीतही यशस्वीच्या नावावर दोन बळी जमा आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात यशस्वीने प्रत्येकी १-१ बळी मिळवला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात यशस्वीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2020 10:16 pm