शुक्रवारचा दिवस भारतीय संघासाठी चांगला गेला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात बाजी मारली. दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडवर ४-० ने मात केली, तर दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभवाचं पाणी पाजलं.

अवश्य वाचा – भारतीय महिलांची न्यूझीलंडवर ४-० ने मात, कर्णधार राणी रामपाल चमकली

पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी १९३ धावांचं आव्हान ठेवलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १४७ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून रवी बिश्नोई आणि अथर्व अंकोलेकरने गोलंदाजीत भेदक मारा केला. अथर्व अंकोलेकरने ५ षटकांत २८ धावा देत ३ फलंदाजांना माघारी धाडलं.

गेल्या काही सामन्यांमध्ये अथर्व अंकोलेकरची Youth Cricket मधली कामगिरी पाहिली असता तो सध्या किती चांगल्या फॉर्मात आहे याची कल्पना येते.

दरम्यान, नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र काही वेळानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावली. बराच काळ पाऊस पडत असल्यामुळे सामन्यातला मोठा वेळ वाया गेला. अखेरीस पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंच आणि सामनाधीकारी यांनी खेळपट्टीची पाहणी करत सामना २३ षटकांचा केला. भारताकडून यशस्वी जैस्वालने नाबाद ५७ तर दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५२ धावांची खेळी केली.

त्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या संघाची सुरुवातही आश्वासक झाली होती. सलामीवीर फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. रवी बिश्नोईने ऑली व्हाईटला माघारी धाडत न्यूझीलंडला धक्का दिला. यानंतर ऱ्ह्यास मारीयूही अंकोलेकरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर न्यूझीलंडचा संघ सावरुच शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत राहिल्यामुळे भारतीय गोलंदाजांचं काम सोपं झालं. भारताकडून रवी बिश्नोईने ४, अथर्व अंकोलेकरने ३, सुशांत मिश्रा आणि कार्तिक त्यागी यांनी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – Ind vs NZ : परदेश दौऱ्याची विजयी सुरुवात, ६ गडी राखत भारताची बाजी