इंदूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक या कट्टर प्रतिस्पध्र्यामध्ये गुरुवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी अव्वल साखळीत अपराजित राहण्याची किमया साधली आहे.

अव्वल साखळीमधील चारपैकी चार सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत. मात्र महाराष्ट्राच्या यशात सांघिक कामगिरीचे योगदान आहे. भरवशाचा अंकित बावणे, आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज निखिल नाईक किंवा अष्टपैलू नौशाद शेख या खेळाडूंनी महत्त्वाच्या क्षणी आपली कामगिरी उंचावली आहे. नाईकने रेल्वेविरुद्धच्या सामन्यात नाबाद ९५ धावांची खेळी साकारून संघाला २१ धावांनी विजय मिळवून दिला.

कर्नाटकची मदार त्यांच्या दर्जेदार गोलंदाजीच्या माऱ्यावर आहे. यात आर. विजय कुमार, व्ही. कौशिक यांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या फलंदाजांना कर्नाटकच्या माऱ्याचा समर्थपणे सामना करण्याचे महत्त्वाचे आव्हान असेल. महाराष्ट्राच्या गोलंदाजीची धुरा डावखुरा मध्यमगती गोलंदाज समद फल्लाहवर असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज डी. जे. मुथूस्वामी त्याला तोलामोलाची साथ देत आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजीत बच्छावसुद्धा सातत्यपूर्ण कामगिरी बजावत आहे.

‘‘आमची सांघिक कामगिरी अप्रतिम होत आहे. अंतिम सामन्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सर्वोत्तम कामगिरी करून जेतेपदाचा करंडक पुण्यात नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,’’ असे अंकितने सांगितले.

कर्नाटककडे मयांक अगरवाल, करुण नायर आणि मनीष पांडे यांच्यासारखे मातब्बर फलंदाजसुद्धा आहेत. याशिवाय बी. आर. शरद आणि सलामीवीर रोहन कदम हे महाराष्ट्राच्या गोलंदाजीचा आरामात सामना करू शकतात.

’  सामन्याची वेळ : सायंकाळी ५.३० वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट

अंतिम सामन्यात आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. आमचे सर्व ११ खेळाडू लयीत आहेत. याचप्रमाणे स्पर्धेतील सातत्य टिकवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

– सुरेंद्र भावे, महाराष्ट्राचे प्रशिक्षक