सिडनी : ‘विश्वातील वेगवान मानव’ अशी ख्याती मिळवलेल्या जमैकाच्या उसैन बोल्टला नुकतीच उत्तेजक प्रतिबंधक चाचणीची नोटीस बजावण्यात आल्याने तो संतप्त झाला आहे.

१०० मीटर धावण्याच्या शर्यतीचा विश्वविक्रम अद्यापही नावावर कायम असलेल्या बोल्टने गतवर्षी अ‍ॅथलेटिक्समधून निवृत्ती पत्करली. त्यानंतर त्याने व्यावसायिक फुटबॉलपटू बनण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियातील सेंट्रल कोस्ट मरिन यांच्याशी करार केला. त्या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल फेडरेशनने ही उत्तेजक नमुना देण्याबाबतची नोटीस बजावली असल्याचे बोल्टने त्याच्या ‘इन्स्टाग्राम’ खात्यावर म्हटले आहे.

‘‘मी सध्या धावपटू नाही, तसेच अद्याप व्यावसायिक फुटबॉलपटूदेखील बनलेलो नाही. त्यामुळे मी ही चाचणी का करू द्यावी,’’ असा सवालदेखील बोल्टने केला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील क्रीडा उत्तेजक प्रतिबंधक पदाधिकाऱ्यांनी बोल्ट हा या चाचणीस पात्र असल्याचे सांगून त्याला रक्त आणि लघवीचा नमुना देण्यास सांगितले आहे.