आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे खेळाच्या प्रतिष्ठेस तडा गेला आहे. अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी सत्यशोधक यंत्रणेची मदत घेतली पाहिजे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने सांगितले.
‘‘हा खेळ सभ्य गृहस्थांचा क्रीडाप्रकार मानला जातो. मात्र सामना किंवा निकाल निश्चिती अणि सट्टेबाजीमुळे या खेळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी पंचांना योग्य रीतीने मार्गदर्शन केले पाहिजे. ज्या खेळाडूंवर असे आरोप केले जातात, त्यांनी स्वत:हून सत्यशोधक यंत्रणेची मदत घेतली पाहिजे व आपली बदनामी टाळावी,’’ असे वॉ यावेळी म्हणाला.
अ‍ॅशेस मालिकेबाबत वॉ याने सांगितले की, ‘‘ऑस्ट्रेलियाचा संघ अतिशय खडतर कसोटीतून जात आहे. खरे तर आमच्या संघात चांगले नैपुण्य आहे. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी त्यांनी स्वत:च्या क्षमतेबाबत विश्वास बाळगला पाहिजे. स्टीव्हन स्मिथ हा आमच्या देशाचा भावी सुपरस्टार आहे. शेन वॉटसन हा अतिशय अनुभवी व गुणवान खेळाडू आहे. मात्र सध्या तो बॅडपॅचमधून जात आहे.’’