यूईएफए २०१८-१९ चॅम्पियन्स लीगचे पुरस्कार जाहीर

मोनाको : लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला. गुरुवारी रात्री झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (२०१८-१९ या वर्षांतील कामगिरीसाठी)व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.

लिव्हरपूलला २०१८-१९च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता. बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१२मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नेदरलँड्स फुटबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या व्हॅन डिकला मे महिन्यात प्रीमियर फुटबॉल लीगचासुद्धा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते. २८ वर्षीय व्हॅन डिकने युव्हेंटसच्या रोनाल्डो आणि बार्सिलोनाचा मेसी यांना मागे टाकले. गेल्या आठ वर्षांत मेसी अथवा रोनाल्डो यांच्यापैकीच एकाने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.

याव्यतिरिक्त, मेसीने सर्वोत्तम आक्रमक, तर लिव्हरपूलच्याच अ‍ॅलिसन बेकरने सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळवला.

पुरस्कार विजेते

सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू  व्हॅन डिक

गोलरक्षक             अ‍ॅलिसन बेकर

मध्यरक्षक            फ्रँक डी जाँग

आक्रमणपटू            लिओनेल मेसी

बचावपटू             व्हॅन डिक