सेनादल क्रीडा संस्थेचा धावपटू सांवरू यादवने पुरुषांमध्ये जेतेपद पटकावले, तर गतविजेत्या आणि राष्ट्रकुल पदकविजेत्या कविता राऊतने ललिता बाबरला मागे टाकत वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पध्रेतील महिलांचे विजेतेपद पटकावले.
महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या तीन अव्वल धावपटूंमध्ये अटीतटीची लढत झाली. अखेर कविता राऊतने प्रथम, तर ललिता बाबर आणि मोनिका आथरे यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. ‘‘या वर्षांतील आणि विवाह झाल्यानंतरची ही माझी पहिली स्पर्धा आहे. ही चांगली सुरुवात आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेत चांगल्या कामगिरीची मला आशा आहे,’’ असे २८ वर्षीय कविताने सांगितले.
निकाल :
मॅरेथॉन (पुरुष) : १. सांवरू यादव २:२७:२७, २. लिंखोइ बिनिंग २:३१:१७, ३. बुधा राम २:३३:३३ अर्धमॅरेथॉन (पुरुष) : १. जी. लक्ष्मणन १:०७:०६, २. सोजी मॅथ्यू १:०७:४७, ३. करण सिंग १:०८:०० अर्धमॅरेथॉन (महिला) : १. कविता राऊत १:२२:०६, २. ललिता बाबर १:२२:०७, ३. मोनिका आथरे १:२२:०७.
११६ वर्षांच्या तरुणाचा मॅरेथॉनमध्ये धावण्याचा विक्रम
मुंबई  (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या ११६ वर्षांच्या धर्मपाल सिंगने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी ११ किमीच्या शर्यतीत भाग घेऊन ती पूर्ण करण्याचा पराक्रमही दाखवला.धरमपाल हे उत्तर प्रदेशातल्या मेरठ जिल्ह्यातील गुहा गावचे शेतकरी. आपले वय ११६ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यासाठी पासपोर्ट आणि पॅन कार्ड त्यांनी सोबत ठेवले होते. यावर त्यांची जन्म तारीख ६ ऑक्टोबर १८९७ आहे. ११६व्या वर्षी पासपोर्ट मिळणे हासुद्धा एक विक्रम मानावा लागेल. त्याची ठणठणीत प्रकृती पाहता त्यांचे वय ११६ नक्कीच नसावे अशी चर्चा रंगली होती. ‘‘दिल्लीतील एका परिचिताने या मॅरेथॉनबद्दल सांगितल्याने मी मुंबईत आलो. मी शाकाहारी असून अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतो,’’ असे धरमपाल यांनी सांगितले. धर्मपाल यांच्या वयाबाबत आम्ही साशंक आहोत. पण पासपोर्ट आणि पॅनकार्ड पाहून आम्ही तेच वय नोंद केल्याचे आयोजकांनी सांगितले.