क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांचा विश्वास

नागपूर : आत्मविश्वासाने खेळपट्टीवर आपली प्रतिभा दाखवत विदर्भ क्रिकेट संघाने लागोपाठ दुसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यामुळे पुढील वर्षीही विदर्भ विजयाची हॅट्ट्रिक साधेल, असा विश्वास क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केला.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत महत्त्वाची मानली जाणारी रणजी करंडक स्पर्धा विदर्भाने जिंकली आणि नवा इतिहास रचला. व्हीसीएच्या जामठा मदानावर आज गुरुवारी विदर्भाने सौराष्ट्रचा ७८ धावांनी धुव्वा उडवत ही ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे,अंतिम सामन्यात विदर्भाच्या फिरकीपटूंची कामगिरी मोलाची ठरली. आदित्य सरवटेने दोन्ही डावात तब्बल ११गडी बाद करण्याची किमया साधली. विदर्भाच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच नागपूरकरांनी एकच जल्लोष केला.

गतविजेतेपद योगायोगाने मिळाले अशी जी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती, त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. आता विदर्भ संघाची ओळख चॅम्पियन संघ म्हणून देशपातळीवर झाली आहे. विजेतेपद राखणे सोपी बाब नाही.

– उस्मान गनी, माजी रणजीपटू, विदर्भ संघ

विदर्भाला आता जिंकण्याची सवय लागली आहे. त्यामुळे पुढील वर्षीही विदर्भ नक्कीच बाजी मारेल. संघातील प्रत्येक खेळाडूंनी जेव्हा आवश्यकता होती तेव्हा आपली कामगिरी सक्षमतेने पार पडली आहे.आता पुढे इराणी चषकातही अशी कामगिरीची अपेक्षा आहे.

– हेमंत वसू, माजी कर्णधार, विदर्भ संघ

गेल्या तीन वर्षांपासून विदर्भाची कामगिरी सातत्याने उंचावली आहे. याचे कारण म्हणजे व्हीसीएने २००८ साली क्रिकेट अकादमी स्थापन करून दर्जेदार खेळाडू मिळवले. त्याचा सकारात्मक परिणाम आता पुढे आला आहे.

– ए.डी. देशमुख, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच

विजयाचे खरे श्रेय प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना जाते. त्यांनी खेळाडूंची प्रतिभा ओळखून चॅम्पियन संघाची बांधणी केली. कर्णधार फैज फजलच्या नेतृत्वात संघ चांगला खेळतोय. पुढील वर्षी जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली जाईल यात शंका नाही.

– शरद पाध्ये, माजी मिडीया प्रभारी, व्हीसीए.