ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने आपल्या कारकिर्दीत अनेक फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने खूप आधी पदार्पण केले असले, तरी खऱ्या अर्थाने त्याचे नाव दिग्गज फिरकीपटूंच्या यादीत सामील होण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. ४ जून १९९३ हा दिवस शेन वॉर्न कधीही विसरू शकणार नाही. २७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शेन वॉर्नने असा एका फिरकी चेंडू टाकला, ज्याची क्रिकेटच्या इतिहासात नोंद झाली. त्याने टाकलेला चेंडू ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ (Ball of The Century) म्हणून आजही प्रचलित आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या १४३ वर्षांच्या इतिहासात अनेक गोलंदाजांनी कायम लक्षात राहिल अशी कामगिरी केली, पण वॉर्नच्या चेंडूला शतकातील सर्वोत्तम चेंडूचा नावलौकिक मिळाला. ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉर्न आजच्याच दिवशी २७ वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध पहिली अ‍ॅशेस कसोटी खेळायला उतरला. या कसोटी सामन्यात त्याने टाकलेला चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळला. जवळपास ९० अंशात वळलेला चेंडूने थेट स्टंपचा वेध घेतला आणि इंग्लंडचा दिग्गज फलंदाज माईक गेटिंग यांचा त्रिफळा उडाला.

पाहा हा व्हिडीओ –

इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा कसोटी सामना खेळला गेला होता. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करत अवघ्या २८९ धावा केल्या होत्या. त्यास प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडच्या जोडीने दमदार सलामी दिली, पण वॉर्नच्या त्या चेंडूने साऱ्यांनाच चकित करून टाकले.