क्रिकेटच्या मैदानावर दररोज नवे बदल घडत असतात. फलंदाजांच्या चेहऱ्याचे रक्षण करणाऱ्या हेल्मेटमध्येही कालानुरूप बदल झाले. पण तरीदेखील अनेकदा फलंदाजाच्या हेल्मेटला चेंडू लागण्याचा घटना घडताना दिसतात. यामध्ये काही वेळा फलंदाज जखमी होतात. काही फलंदाजांना झालेली दुखापत गंभीर स्वरुपाचीदेखील ठरते. न्यूझीलंड-श्रीलंका कसोटी सामन्या दरम्यान मैदानात अशीच एक गोष्ट पाहायला मिळाली.

सध्या यजमान श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजीच्या वेळी ८२ व्या षटकात ही गोष्ट घडली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट हा फलंदाजी करत होता. ८२ षटकातील दुसऱ्या चेंडूवर बोल्टने स्विपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. तो फटका खेळताना चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि उडून थेट बोल्टच्या हेल्मेटमध्ये जाऊन अडकला.

चेंडू हेल्मेटमध्ये अडकल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये चेंडू काढण्यावरून चढाओढ लागली. कारण चेंडू बॅटला लागून जमिनीवर टप्पा न पडता हेल्मेटमध्ये अडकला होता. त्यामुळे चेंडू काढून ते बोल्टला बाद करण्याचा प्रयत्न करणार होते. अर्थात हे सारं खेळकर आणि मजा मस्तीच्या वातावरणात सुरू होते.

दरम्यान, सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला. अनुभवी रॉस टेलरच्या ८६ धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ही मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २६७ धावांत आटोपला आणि श्रीलंकेने १८ धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेकडून कुशल मेंडीस, अँजेलो मॅथ्युज आणि निरोशन डिक्वेल्ला या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावातही न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली होती. ३० षटकांच्या खेळात न्यूझीलंडची अवस्था ८५ धावांत ४ बाद अशी झाली होती.