श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा आपल्या साईड आर्म गोलंदाजी आणि भन्नाट यॉर्करसाठी ओळखला जातो. मात्र, श्रीलंकेतील एका स्थानिक सामन्यात वेगाचा हा बादशहा चक्क फिरकीपटू म्हणून मैदानात उतरला. टिजय लंका या संघाचं नेतृत्व करताना लसिथ मलिंगाने फिरकी गोलंदाजी करत सामन्यात ३ बळी टिपले.

लसिथ मलिंगाचा हा अवतार प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांसाठीही काहीसा बुचकळ्यात पाडणाराच होता. एरवी भलामोठा रनअप घेऊन समोरच्या फलंदाजाची दांडी गुल करणारा मलिंगा या सामन्यात संपूर्णपणे वेगळ्या शैलीत गोलंदाजी करत होता. मलिंगाने सामन्यात तीन बळी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. टिजय लंका या संघाने सामन्यात ८२ धावांनी विजय मिळवत स्थानिक स्पर्धेच्या अ गटाचं विजेतेपद पटकावलं.

भारताच्या श्रीलंका दौऱ्यात लसिथ मलिंगाला फारशी चमक दाखवता आली नव्हती. या दौऱ्यात मलिंगाने वन-डे कारकिर्दीतला ३०० बळींचा टप्पा पूर्ण केला. मात्र, यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली नव्हती. मलिंगासह श्रीलंकेच्या अनेक सिनीअर खेळाडूंनी अखेरच्या टी-२० सामन्यासाठी लाहोरला जाण्यास नकार दिला होता.