विजय हजारे करंडक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व अटीतटीच्या लढतीत बंगालने विदर्भावर १७ धावांनी विजय मिळवला. मनोज तिवारीचे दमदार शतक आणि वीर प्रताप सिंगच्या सहा बळींच्या जोरावर बंगालने उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगालला ५६ धावांवर पहिला धक्का बसला तरी त्यानंतर श्रीवत्स गोस्वामी आणि मनोज तिवारी यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी रचत संघाला ३१८ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिवारीने ४ चौकार आणि ९ षटकारांच्या जोरावर १३० धावांची खेळी साकारली, तर गोस्वामीने ९ चौकारांच्या जोरावर ८४ धावांची खेळी साकारली.
बंगालच्या ३१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भच्या फैझ फैझल (१०५) आणि एस. बद्रिनाथ (१००) यांनी शतके झळकावत चांगली झुंज दिली, पण वीर प्रताप सिंगने या दोघांसहित सहा फलंदाजांना बाद करीत बंगालच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात ओडिशाने गोव्यावर फक्त एका धावेने विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
बंगाल : ५० षटकांत ५ बाद ३१८ (मनोज तिवारी १३०, श्रीवत्स गोस्वामी ८४; रवी कुमार ठाकूर २/७७) विजयी वि. विदर्भ : ५० षटकांत ८ बाद ३०१ (फैझ फैझल १०५, एस. बद्रीनाथ १००; वीर प्रताप सिंग ६/५१).