बेंगळूरु : सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने साकारलेल्या अप्रतिम ८४ धावांच्या खेळीमुळे महाराष्ट्र संघाने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटातील सामन्यात रेल्वेवर सात विकेट राखून मात केली. रेल्वेने दिलेले १८१ धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने तीन फलंदाजांच्या मोबदल्यात ४१.२ षटकांत गाठले.

प्रथम फलंदाजी करताना रेल्वेचे सलामीवीर सौरभ वाकस्कर (१) व करन शर्मा (०) लवकर बाद झाले.  मात्र त्यानंतर मृणाल देवधरने ६४ धावा करीत संघाला सावरले. त्याला आशीष यादव (३०) व प्रशांत अवस्थी (२५) यांनी चांगली साथ दिली. मात्र इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे रेल्वेचा डाव ४८.२ षटकांत १८० धावांवरच संपुष्टात आला. महाराष्ट्रातर्फे समद फलाह व अनुपम संकलेचा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

महाराष्ट्रातर्फे ऋतुराज व जय पांडेने पहिल्या विकेटसाठी ८८ धावा जोडत सामन्यातील चुरसच संपवून टाकली. जय ३८ धावांवर बाद झाला, मात्र ऋतुराजने नऊ चौकार व एका षटकारासह ८४ धावा काढल्या. शशुमा काझीने षटकार लगावत (नाबाद ९) महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

रेल्वे : ४८.२ षटकांत सर्व बाद १८० (मृणाल देवधर ६४, आशीष यादव ३०; अनुपम संकलेचा २/१६) पराभूत वि. महाराष्ट्र : ४१.२ षटकांत ३ बाद १८६ (ऋतुराज गायकवाड ८४, जय पांडे ३८; अविनाश यादव २/३९).