नूर-सुलतान : प्रशिक्षकांनी सुचवलेले डावपेच महत्त्वाच्या सामन्यात अचानकपणे बदलल्याचे फळ मला मिळाले, अशा शब्दांत ऑलिम्पिकसाठीचे पात्रता निकष पार करणाऱ्या विनेश फोगटने सांगितले.

‘‘वैयक्तिक प्रशिक्षक वुलर अकोस यांनी मला सारा अ‍ॅन हिल्डेब्रँड हिच्यापासून दूर राहण्याचे तसेच तिचा उजवा हात जखडून ठेवण्याचे आणि पायावर हल्ला चढवण्याचे सुचवले होते. पण मैदानात उतरल्यानंतर मी बरोबर त्याच्या उलट रणनीती अवलंबली,’’ असे विनेशने सांगितले.

ती म्हणाली, ‘‘प्रशिक्षक नेहमीच वेगवेगळे डावपेच आखतात. पण मैदानात उतरल्यानंतर ते डावपेच यशस्वी होतील की नाही, हे आपल्यालाच कळत असते. तिच्या पायावर हल्ला करण्याऐवजी मी माझा बचाव भक्कम केला. तिच्या क्षमतेची जाणीव असल्याने पिछाडीवर पडणे माझ्यासाठी धोकादायक ठरले असते. साराने सर्व शक्ती पणाला लावली, पण तिचे सर्व डावपेच फोल ठरल्याने मला विजय मिळवता आला.’’