क्रिकेट हा खेळ गोऱ्या साहेबांचा असला तरी आजच्या घडीला बीसीसीआयचा तोरा गोऱ्यांपेक्षा अधिक आहे, हे क्रिकेट जाणकार कदाचित नाकारणार नाही. आयपीएलचे संक्रमण असो, लोढा समितीच्या शिफारशीवर रंगलेलं वादळ असो किंवा प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीसाठी नव्याने अर्ज मागवण्याचा बीसीसीआयने घेतलेला निर्णय असो यासारख्या अनेक प्रकारातून बीसीसीआयने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतनंतर अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा बीसीसीआयकडे वळल्या. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी ते कोणाला संधी देणार याची उत्सुकता सर्वांना लागून होती. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती आणि सल्लागार समितीच्या साक्षीने बीसीसीआयने नियुक्तीमध्ये पारदर्शकतेचा भरवसा ही दिला. दुसरीकडे कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली रवी शास्त्री यांच्यासाठी फिल्डींग लावल्याच्या चर्चेला उधाण आले. या चर्चेतच प्रशिक्षक निवडीसाठी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण या दिग्ग्जांच्या सल्लागार समितीने सोमवारी पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. वीरेंद्र सेहवाग वगळता अन्य कोणताही उमेदवार प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी प्रत्यक्ष सहभागी झाला नाही. रवी शास्त्री, टॉम मूडी आणि इतर दोन उमेदवारांनी स्काईपच्यामाध्यमातून मुलाखती देत डिजिटल इंडियाला हात भार लावला म्हणालायला हरकत नाही.

मुलाखती पार पडल्यानंतर सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुलीने प्रशिक्षकपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यास अवधी लागेल, असे सांगितले. त्याचा हा पवित्रा एका अर्थाने समर्थनीय होता. कारण प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड करायची होती. त्यामुळे मुलाखतीनंतर क्षणात निर्णय जाहीर करणे हे म्हणजे पहिल्या चेंडूवर षटकाराची अपेक्षा करण्यासारखेच होते. पण सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीला झटपट निर्णय हवा होता. या समितीला सौरवच्या विचार विनिमयाची रणनिती फारशी रुचली नाही. परिणामी समितीच्या आदेशानंतर बीसीसीआयने रवी शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी रंगलेल्या चर्चेचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न केला तर एका अर्थाने बीसीसीआयने विराट हट्टच पूर्ण केला.

मुख्य प्रशिक्षकाचे नाव जाहीर करताना बीसीसीआयने गोलंदाजी आणि परदेशातील सामन्यासाठी फलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा करुन विराटला एक नव्हे तर चक्क दोन गुरुजींची नियुक्ती करुन चक्क यॉर्करच टाकलाय. यात राहुल द्रविड आणि झहीर खान या दिग्गजांना भारतीय संघासोबत पुन्हा मैदानात उतरण्याची संधी देण्यात आली. यापूर्वी झहीर खानने गोलंदाजी प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भारतीय संघासोबत पूर्णवेळ काम करणे, शक्य नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले होते. त्यामुळे तो भारतीय संघासोबत दिसेल ही आशा जवळ जवळ धूसर झाली होती. मात्र बीसीसीआयने राहुल द्रविडकडे परदेशी दौऱ्यादरम्यान भारतीय फलंदाजांना शिकवणी देण्याचे काम सोपविले आहे. राहुल द्रविड आणि झहीर खान या दोघांच्या योगदानामुळे भारतीय क्रिकेटला फायदा होईल यात शंका नाही. पण, एकूणच विराट कोहलीचा हट्ट पूर्ण करताना द्रविड आणि झहीर खानची नियुक्ती करुन रवी शास्त्रींच्या विरोधातील मंडळींना खूश करण्यासाठी बीसीसीआयने हा माईंड गेम खेळलाय का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो.