राजकोटच्या मैदानावर भारत आणि इंग्लड यांच्यात रंगलेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली. या मैदानावर खेळविण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापासून भारताने डिआरएस प्रणालीच्या वापराला सुरुवात केली. पहिल्यांदाच वापरलेल्या या तंत्रज्ञानाचा भारताला म्हणावा तसा फायदा करुन घेता आला नाही. दुसऱ्या डावात भारताने जर चेतेश्वर पुजारा पायचित झाल्यानंतर तिसऱ्या पंचाकडे दाद मागीतली असती,  तर पुजाराला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली असती. पण भारताने डिआरएस प्रणालीचा उपयोग करणे टाळल्यामुळे पुजाराला पंचानी दिलेल्या निर्णयानंतर तंबूचा रस्ता धरावा लागला. चेतेश्वर पुजारा यावेळी १८ धावावर खेळत होता.

पुजारा बाद झालेल्या निर्णयानंतर भारताला या प्रणालीचा फायदा करुन घेता आला नसला तरी, कर्णधार विराट कोहलीने या प्रणालीचे समर्थन केले. सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने संघाला या सामन्यातून भरपूर काही शिकण्यास मिळाल्याचे सांगितले. पराभव आणि विजय याशिवाय भारतीय संघ आता सामना अनिर्णित राखण्याचे कसब शिकला आहे, असे विराटने म्हटले आहे. दरम्यान डिआरएस प्रणालीचा वापरामध्ये प्रामुख्याने गोलंदाज आणि यष्टिरक्षकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे विराट कोहलीने म्हटले. या दोघांच्या मागणीनंतर तिसऱ्यापंचाकडे दाद मागण्याची जबाबदारी कर्णधाराला पाडत असतो असे कोहली म्हणाला.  दरम्यान  मैदानावर फलंदाजी करत असताना डिआरएस प्रणालीचा आलेला अनुभव सांगताना  नॉनस्ट्राईकवर असणाऱ्या फलंदाजाची भूमिका देखील महत्वाची असल्याचे विराट कोहलीने सांगितले. या प्रणालीचा वापर महत्त्वपूर्ण परिस्थितीमध्ये करावा लागतो. असेही विराट म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीमध्ये पहिल्या डावामध्ये ४० धावावर हिट विकेटचा बळी ठरलेल्या विराट कोहलीने दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण खेळी करत नाबाद ४९ धावांची खेळी केली होती.