टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्मात असून माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही  कोहलीचे भरभरुन कौतुक केले आहे. कोहली सध्या २८ वर्षांचा असून तो आणखी १० वर्ष क्रिकेट खेळू शकतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम कोहलीच मोडू शकतो असे भाकित सेहवागने वर्तवले आहे.

सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीचे सर्वत्र कौतुक होत असून माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही कोहलीचा चाहता झाला आहे. ‘इंडिया टीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेहवागने कोहलीची स्तुती केली. सेहवाग म्हणाला, सचिनसारखा फलंदाज पुन्हा मैदानात दिसेल असे आम्हाला वाटत नव्हते. पण विराट कोहली आल्यावर आमच्या भूमिकेत बदल झाला. कोहली सचिनच्या पुढे जाऊ शकतो. सध्या तो २८ वर्षांचा असून तो आणखी १० वर्ष क्रिकेट खेळू शकतो. या कालावधीत कोहली अनेक विक्रमांना गवसणी घालून सचिनच्या पुढे जाऊ शकतो असे सेहवागने सांगितले.

विराट कोहलीने वन- डे क्रिकेटमध्ये ३० शतकं ठोकले असून सर्वाधिक शतकांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. रिकी पाँटींग आणि कोहली हे सध्या संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. तर सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह पहिल्या स्थानी आहे. कोहलीचा सध्या फॉर्म पाहता तो आगामी काळात सचिनचा विक्रम मोडेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.