देशात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र यंदाची स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. याव्यतिरीक्त सर्व संघमालकांना होणारं नुकसानही जवळपास १०० ते २०० कोटींच्या घरात असणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. आतापर्यंत श्रीलंका आणि दुबई या दोन क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्याची तयारीही दर्शवली आहे. माजी गोलंदाज अतुल वासन यांनी केलेल्या दाव्यानुसार यंदाचा आयपीएल हंगाम दुबईत होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – टी-२० विश्वचषक रद्द होणार असेल तर IPL ही रद्द व्हायला हवं – अ‍ॅलन बॉर्डर

“अनेकं लोकांचं म्हणणं आहे की यंदाचं आयपीएल दुबईत होईल. मी काही दिवसांपूर्वी काही खेळाडूंशी बोललो, त्यात विराटही होता…प्रत्येकाच्या बोलण्यातून मला असं जाणवत होतं की यंदाचं आयपीएल दुबईत पार पडेल अशी शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात हा हंगाम खेळवण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न आहेत. खेळाडूंनीही यासाठी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे माझ्या मते बीसीसीआय सध्या त्या दृष्टीकोनातून काम करत आहे.” अतुल वासन Sportskeeda संकेतस्थळाशी बोलत होते.

अवश्य वाचा – कृपा करुन आम्हाला विदेशी टी-२० लिग खेळण्याची परवानगी द्या – रॉबिन उथप्पा

सध्या आयसीसीशी संलग्न असलेल्या सर्व क्रिकेट बोर्डांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. आयपीएलच्या माध्यमातून सर्व क्रिकेट बोर्डांना चांगली रक्कम मिळते. यासाठी यंदाचा टी-२० विश्वचषक रद्द करुन त्याचं आयोजन पुढे ढकलण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांचा टी-२० विश्वचषक रद्द करुन आयपीएल खेळवण्यास विरोध आहे. “टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द होऊन त्या जागी आयपीएल खेळवण्यात आलं तर त्यामुळे चुकीचा पायंडा पाडला जाईल असंही बॉर्डर म्हणाले. “वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करण्यात आलं, तर इतर देशांनी निषेध म्हणून आपल्या खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवू नये”, असं आवाहन बॉर्डर यांनी केलं आहे.