१५ ऑगस्टला संध्याकाळी सात वाजल्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अचानक निवृत्ती जाहीर केल्यामुळे धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर धोनीला त्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकरने धोनी आणि विराट कोहली यांच्या कर्णधारपदाच्या शैलीतला महत्वाचा फरक सांगितला आहे.

“विराट आणि धोनीच्या शैलीत मला सर्वात महत्वाचा फरक जो जाणवला तो म्हणजे धोनी हा अनेकदा रणनिती आखताना फिरकीपटूंवर अधिक विश्वास दाखवायचा. त्या तुलनेत विराट कोहलीने जलदगती गोलंदाजांवर नेहमी जास्त विश्वास दाखवला आहे. याच कारणामुळे सध्याच्या घडीला भारतीय संघातील जलदगती गोलंदाज हे भारतासोबत बाहेरील देशांमध्येही चांगली कामगिरी करत आहेत. प्रत्येक सामन्यागणिक गोलंदाजांची कामगिरी सुधारते आहे. दोघांच्याही विचारातला हा फरक मला नेहमी जाणवतो.” अजित आगरकर Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

विराटकडे भारतीय संघाचं कर्णधारपद येऊन मोठा कालावधी लोटला आहे. तिन्ही प्रकारात त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गोलंदाजांवर किंवा खेळाडूंवर विश्वास दाखवलात तर कर्णधार म्हणून तुम्हाला नेहमी चांगलेच निकाल मिळतील, अजित आगरकरने आपलं मत मांडलं. २००७ साली भारताच्या टी-२० विश्वचषक संघात अजित आगरकरने धोनीच्या नेतृत्वाखाली भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती स्विकारली असली तरीही पुढील आयपीएल हंगामांमध्ये धोनी खेळत राहणार आहे.