इंग्लंड दौऱ्यात एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी गमावली. पहिला सामना जिंकूनही पुढील सलग २ सामने भारताने गमावले. कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रुट यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवून मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. भारताने दिलेले २५७ धावांचे आव्हान इंग्लंडने ८ गडी राखून पूर्ण केले. या सामन्यानंतर विश्वचषक स्पर्धेसाठी एखाद्या खेळाडूवर अवलंबून राहून चालणार नाही. संघात समतोल हवा, असे सूचक विधान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे. तो सामना संपल्यानंतर बोलत होता.

विश्वचषक ही मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत तुल्यबळ संघ एकमेकांशी लढतात. त्यामुळे या स्पर्धेसाठी आम्हाला कोणा एका खेळाडूवर किंवा विभागावर अवलंबून राहता येणार नाही. आम्हाला जर चांगली कामगिरी करायची असेल तर त्यासाठी आम्हाला सर्व विभागात आमची कामगिरी उंचावावी लागेल. तरच, विश्वचषकात आम्हाला आमच्या संघाचा ठसा उमटवता येतील, असे मत त्याने व्यक्त केले.

आदिल रशीदच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाल्यावर अवाक झालेला विराट कोहली</strong>

 

पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आहे. त्या आधी आम्हाला आमच्या संघात समतोल साधणे गरजेचे आहे. संघात आणि खेळाडूंमध्ये काय सुधारणा हवी आहे, ते या मातीतील सामने आम्हाला शिकवत आहेत. याच मातीत पुढच्या वर्षी विश्वचषक आहे. आम्हाला समतोल संघ तयार करणे गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे हे विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी आम्हाला जमायला हवे, असेही त्याने सांगितले.