वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराला विश्वास

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ‘आयसीसी’च्या सर्व स्पर्धा जिंकू शकतो, असा विश्वास वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराने व्यक्त केला आहे.

३१ वर्षीय कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला अद्याप एकही ‘आयसीसी’ स्पर्धा जिंकता आलेली नसली तरी २०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आणि २०१९च्या विश्वचषकात भारताने अनुक्रमे अंतिम आणि उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळेच काही आठवडय़ांपूर्वी फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोशी कोहलीची तुलना करणाऱ्या लाराने पुन्हा एकदा त्याचे कौतुक केले आहे.

‘‘कोहलीकडे अफाट कौशल्य असून त्याच्या कर्णधारपदात भारत नक्कीच ‘आयसीसी’ स्पर्धावर वर्चस्व मिळवू शकतो. विशेषत: सध्याच्या भारतीय संघाला कोणत्याही खेळपट्टीवर कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी विजय कसा मिळवायचा हे अवगत असल्याने आगामी ‘आयसीसी’ स्पर्धामध्ये त्यांना रोखणे कठीण असेल,’’ असे ५० वर्षीय लारा म्हणाला.

‘‘भारताने गेल्या ४-५ वर्षांमध्ये एकही ‘आयसीसी’ स्पर्धा जिंकली नसली तरी कोहलीचा संघ नक्कीच हा पराक्रम करू शकतो. ‘आयसीसी’ स्पर्धा असली की प्रत्येक संघाला उपांत्य अथवा अंतिम फेरीत आपल्याला भारताचा सामना करावा लागेल, याची कल्पना असते,’’ असेही लाराने सांगितले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३मध्ये चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले होते.

लाराची कोहली-स्मिथला नापसंती

कोहली आणि स्मिथ यांच्यापैकी ४०० धावांचा विक्रम मोडण्यासाठी एकाची निवड करायची असल्यास तू कोणाला पसंती देशील, असे विचारले असता लाराने या दोघांपेक्षाही अन्य दोन फलंदाजांना पसंती दिली आहे. ‘‘स्मिथ हा एक महान खेळाडू असला तरी तो प्रतिस्पध्र्यावर संपूर्ण आक्रमण करत नाही. त्याचप्रमाणे कोहलीसुद्धा एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. मात्र या दोघांपैकी एकही जण माझा विक्रम मोडेल, असे मला वाटत नाही. त्याउलट डेव्हिड वॉर्नर किंवा रोहित शर्मा माझा विक्रम मोडू शकतील. दोघांमध्येही आक्रमक तसेच संयमी फलंदाजी करण्याचीही क्षमता असून त्यांचा दिवस असल्यास प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज अक्षरश: हतबल होतात. ते कधीही सामन्याचा नूर पालटू शकतात’’ असे लारा म्हणाला.