भारतीय संघाने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचे दावेदार मानले जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला साखळी फेरीत धूळ चारली होती. काही दिवसांपूर्वीच या सामन्याला एक वर्ष झालं. या सामन्यात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी एक गोष्ट कर्णधार विराट कोहलीने केली होती. सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीला आवडला नाही. त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे तर त्याने स्मिथसाठी टाळ्या वाजवा असं प्रेक्षकांना सांगितले आणि या प्रकारासाठी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफीदेखील मागितली. त्यानंतर स्मिथने कोहलीला हात मिळवून धन्यवाद म्हटलं होतं. तसेच या कृत्यासाठी कोहलीला 2019 ICC Spirit of Cricket पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विराटने स्मिथसाठी केलेल्या या कृत्याची साऱ्यांनीच वाहवा केली. चेंडू कुरतडण्याच्या प्रकारावरून स्मिथला चाहत्यांनी चिडवलं होते. पण विराट मैदानावरील गोष्टी सांभाळून घेतल्या. त्यानंतर हा दोघांची पुन्हा एकदा चर्चा रंगली. क्रिकेटचा खेळ सध्या बंद असल्याने स्टीव्ह स्मिथने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्याने लाइव्ह व्हिडीओ चॅट न करता, थेट इन्स्टा स्टोरीवर प्रश्नांची उत्तर दिली. त्यावेळी एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला की विराट कोहलीचं वर्णन एका शब्दात काय करशील? त्यावर स्मिथने त्याच्यासाठी ‘freak’ म्हणजेच विलक्षण खेळाडू असा शब्द वापरला.

“विराट आणि स्मिथ या दोघांमध्ये भेद करणं खूप कठीण आहे. दोन्ही खेळाडू अत्यंत प्रतिभावान आहेत. त्यामुळे त्यांची तुलना करताना एक गोलंदाज म्हणून विचार करेन आणि त्यांना गोलंदाजी करताना कसं बाद करू शकेन याचा विचार करेन. कोहलीचा विचार केला तर तो अत्यंत तंत्रशुद्ध फटकेबाजी करतो. वेगवान गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूला दिशा देण्याची कला त्याला अवगत आहे. मनगटी फटकेही तो सुंदर खेळतो आणि कर्णधार म्हणूनही तो अप्रतिम आहे”, असे मत ब्रेट ली याने व्यक्त केलं होतं.