सिडनीच्या मैदानावर भारतीय संघाला सलग दुसऱ्या वन-डे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं ३९० धावांचं विशाल आव्हान भारतीय संघाला पेलवलं नाही. ५१ धावांनी सामन्यात बाजी मारत ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार लोकेश राहुल यांनी चांगली खेळी केली. परंतू धावांचं लक्ष्य मोठं असल्यामुळे अपेक्षित धावगती कायम राखण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. याचसोबत दोघांचा अपवाद वगळता इतर भारतीय गोलंदाजांनीही निराशा केली. भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात विराट कोहली अपयशी ठरला असला तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा एक विक्रम सचिनने मोडला आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : भारताच्या पराभवासाठी विराटने गोलंदाजांना ठरवलं जबाबदार, म्हणाला…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता विराट कोहलीचं नाव घेतलं जाणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे विराटने ४६२ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली आहे. हीच कामगिरी करायला सचिनला ४९३ डाव लागले होते. दरम्यान, भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी मैदानावर स्थिरावण्याला प्राधान्य दिला. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोघांना फारसे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. श्रेयस अय्यरला बाद करत हेन्रिकेजने भारताची जोडी फोडली, त्याने ३८ धावा केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलही त्याला चांगली साथ देत होता. ही जोडी मैदानावर कमाल दाखवणार असं वाटत असतानाच हेजलवूडने विराटला माघारी धाडलं, त्याने ८९ धावांची खेळी केली.

कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर ७६ धावा काढून बाद झाला. यानंतर पॅट कमिन्सने एकाच षटकात जाडेजा आणि पांड्याला बाद करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतले फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी २ तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.