यंदा पाच खेलरत्न पुरस्कारांसह तब्बल ७४ जणांना राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आल्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयावर चोहोबाजूंनी टीका होत होती. मात्र क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी त्याचे समर्थन केले आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठीच्या निवड समितीने क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीगीर विनेश फोगट यांच्यासह पाच जणांची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड केली होती. तसेच अर्जुन पुरस्कारासाठी २७ जणांची निवड करण्यात आली होती. त्याचबरोबर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी १३ प्रशिक्षकांची आणि ध्यानचंद पुरस्कारांसाठी १५ जणांची निवड करण्यात आली होती.

‘‘भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिवसेंदिवस उंचावत चालली आहे. जर खेळाडू दमदार कामगिरी करत असतील तर त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने त्यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केले तर उभरत्या खेळाडूंचा अपेक्षाभंग होऊ शकतो. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेने भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारांची संख्या वाढली आहे,’’ असे क्रीडामंत्री रिजिजू यांनी सांगितले.

‘‘राष्ट्रीय पुरस्कारांच्या निवडीत क्रीडा मंत्रालयाचा कोणताही हस्तक्षेप नाही. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील तसेच नामांकित क्रीडापटूंचा समावेश असलेल्या स्वतंत्र निवड समितीने त्यांची निवड केली आहे. दुसरे म्हणजे, या पुरस्कारासाठी अचूक अशी निवड प्रक्रिया राबवण्यात आली आहे. निवड समितीने स्वतंत्र बैठका, चर्चा करून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून खेळाडूंची निवड केली आहे. काही खेळाडूंना यावर्षी वगळण्यात आले असेल तर पुढील वर्षी त्यांचाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येईल,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.

राज्यातील विजेते

* खेलरत्न पुरस्कार : रोहित शर्मा (क्रिकेट)

* अर्जुन पुरस्कार : चिराग शेट्टी (बॅडमिंटन), दत्तू भोकनळ (नौकानयन), राहुल आवारे (कुस्ती), मधुरिका पाटकर (टेबल टेनिस), सारिका काळे (खो-खो), अजय सावंत (अश्वशर्यती), सुयश जाधव (पॅरा-जलतरण)

* द्रोणाचार्य पुरस्कार  : विजय मुनीश्वर (पॅरा-पॉवरलिफ्टिंग)

* ध्यानचंद पुरस्कार : प्रदीप गंधे (बॅडमिंटन), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन), सत्यप्रकाश तिवारी (पॅरा-बॅडमिंटन), नंदन बाळ (टेनिस)

* तेनसिंग नोर्गे पुरस्कार : केवल कक्का

* राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार : लक्ष्य इन्स्टिटय़ूट (पुणे), इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (मुंबई)

पुरस्कारांच्या रकमेत घसघशीत वाढ

पुरस्कार पूर्वीची आताची

खेलरत्न ७.५ लाख   २५ लाख

अर्जुन   ५ लाख १५ लाख

द्रोणाचार्य   ५ लाख १० लाख

ध्यानचंद ५ लाख १० लाख