मध्यप्रदेशातील भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांनी भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहलीच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराटची पाठराखण केली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत काही दिवसांपूर्वीच विराट लग्नाच्या बेडीत अडकला. इटलीमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. पण, परदेशात जाऊन लग्न केल्यामुळे पन्नालाल शाक्य यांनी विराटवर टीका केली होती. विराट हा राष्ट्रभक्त नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीरने याविषयी भाष्य केले. राजकीय नेतेमंडळींनी इतरांच्या खासगी आयुष्यात डोकावणे बंद करावे, असे गंभीरने म्हटले.

विराटच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन होणाऱ्या चर्चांविषयी बोलताना गौतम म्हणाला, ‘हा प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे. त्यामुळे इतरांनी या गोष्टींमध्ये लक्ष देण्याचे आणि आपली प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.’ एखाद्याच्या खासगी आयुष्यातील निर्णयांमध्ये डोकावत त्यावर चर्चा करणे आणि मतप्रदर्शन करणे ही बाब आपल्याला न पटल्याचेच त्याने स्पष्ट केले.

वाचा : बिल गेट्सनाही भावला ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’

विराट कोहलीने परदेशात जाऊन लग्न केल्यामुळे एकीकडे त्याच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला, तर दुसरीकडे मध्यप्रदेशातील भाजपच्या आमदाराने मात्र त्याचा विरोध करत त्याला तो राष्ट्रभक्त नसल्याचे म्हटले. भाजपने मात्र आमदारांच्या या वक्तव्याची कोणतीही जबाबदारी घेतली नव्हती. इथे पन्नालाल यांच्या या वक्तव्याच्या चर्चा शमत नाहीत तोच, आणखी एका भाजप नेत्याने ‘विरुष्का’च्या हनिमूनच्या ठिकाणाविषयीही नाराजी व्यक्त केली होती. ‘१२५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात विराट-अनुष्कला लग्न करता आले नाही. त्यांनी परदेशात लग्न केले यावर आमची काहीच हरकत नाही. पण, हनिमूनसाठी तो पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरलाही जाऊ शकत होता. त्यामुळे पर्यटन क्षेत्रावरही त्याचा चांगला परिणाम झाला असता’, असे भाजप नेते रफीक वाणी म्हणाले.