पाच वेळा जगज्जेतेपद नावावर असणाऱ्या विश्वनाथन आनंदला ग्रेनके क्लासिक बुद्धिबळ स्पध्रेत आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. स्पध्रेच्या पाचव्या फेरीत अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनने त्याला पराभूत केले.

चौथ्या फेरीत आनंदने नॉर्वेच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनकडून हार पत्करली होती. अरोनियनविरुद्ध त्याने आत्मविश्वासाने खेळ सुरू केला, परंतु मग परिस्थिती हाताबाहेर गेली आणि आणखी एका पराभव त्याच्या वाटय़ाला आला.
सलग दुसऱ्या पराभवामुळे दीड गुणांसह आनंद सातव्या स्थानावर फेकला गेला आहे.
कार्लसनने जर्मनीच्या डेव्हिड बारामिझेचा पराभव करून अर्कडिज नॅडिश्च (जर्मनी) याच्यासह साडेतीन गुणांनिशी संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. नॅडिश्चने इटलीच्या फॅबियानो कारूआनाविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. मायकेल अ‍ॅडम्स (इंग्लंड) आणि ईटिन्न्ो बॅक्रॉट (फ्रान्स) यांच्यातील लढतही बरोबरीत सुटली.