भारताच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद याला ताल चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बोरिस गेल्फंड या इस्रायलच्या खेळाडूविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. चौथ्या फेरीअखेर त्याच्या खात्यावर दोन गुण जमा आहेत. अमेरिकन खेळाडू हिकारू नाकामुरा याने तीन गुणांसह स्पध्रेत आघाडी घेतली आहे. त्याने इटलीच्या फॅबिआनो कारुआना याच्यावर शानदार विजय मिळविला. गेल्फंडने शाख्रीयर मामदोवारोव याच्या साथीत प्रत्येकी अडीच गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. शाख्रीयर याने सर्जी कर्जाकिन या रशियाच्या खेळाडूला बरोबरीत रोखले. व्लादिमीर क्रामनिक याला अ‍ॅलेक्झांडर मोरोझेविच याच्याविरुद्धचा डाव अनिर्णीत ठेवावा लागला. मॅग्नस कार्लसन यालाही दिमित्री आंद्रेकिनविरुद्ध अर्धा गुण स्वीकारावा लागला.
रोझोलिमो तंत्राचा उपयोग करीत आनंदने गेल्फंडविरुद्ध सुरुवातीस खेळावर नियंत्रण मिळविले होते. तथापि, गेल्फंडने सिसिलीयन बचाव पद्धतीचा उपयोग करीत आनंदचे डावपेच हाणून पाडले. अखेर ४०व्या चालीनंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.