तुषार वैती, नोएडा

बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर फोक्सवॅगन अमियो चषक मोटार स्पोर्ट्स शर्यतीच्या अखेरच्या दिवशी थरारनाटय़ अनुभवायला मिळाले. विजेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांना मागे टाकण्याच्या शर्यतीत आघाडीच्या दोन शर्यतपटूंच्या कारची झालेली टक्कर, पहिल्याच शर्यतीत पलटी झालेली कार, त्यामुळे थांबवण्यात आलेली शर्यत, या सगळ्या थरारनाटय़ानंतरही कोल्हापूरचा रांगडा गडी ध्रुव मोहिते याने पहिल्या शर्यतीत सातवा क्रमांक पटकावत आपले विजेतेपद निश्चित केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात झालेल्या या मोसमातील अखेरच्या शर्यतीत त्याने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत फोक्सवॅगन अमियो चषकावर आपले नाव कोरले. या शर्यतीत मराठी शर्यतपटूने विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

पहिल्या शर्यतीच्या सुरुवातीलाच थरारनाटय़ घडले. पोल पोझिशन मिळवणारा पुण्याचा प्रतिक सोनावणे आणि ध्रुव मोहिते यांच्यात पहिल्याच वळणावर टक्कर झाली. पहिल्याच लॅपमध्ये (फेरी) हा प्रकार घडल्याने पाहुणा ड्रायव्हर ध्रुवला आघाडी घेण्याची संधी मिळाली. पहिल्या लॅपच्या अखेरच्या वळणावर बांगलादेशचा ड्रायव्हर अरेफीन राफी अहमद याची कार पलटी झाली. काही क्षण ड्रायव्हर बाहेर पडण्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे सुरक्षा कार ट्रॅकवर बोलावण्यात आली. त्यानंतर लाल झेंडा दाखवून शर्यत थांबवण्यात आली. शर्यतीला पुन्हा सुरुवात झाल्यावर शुभोमॉय बॉल याची कार तिसऱ्या वळणावर आदळली. त्यामुळे पहिल्या शर्यतीतून दोन कार बाहेर पडल्या. अखेर दिल्लीच्या ध्रुव बहलने आघाडी टिकवत पहिल्या शर्यतीचे जेतेपद पटकावले. प्रतिकला दुसऱ्या तर डेंग्यूच्या आजारातून बरे झाल्यानंतर शर्यतीत उतरलेल्या ठाण्याच्या सौरव बंडोपाध्याय याने तिसरा क्रमांक प्राप्त केला.

दुसऱ्या शर्यतीच्या सुरुवातीला पहिल्या वळणावर गोव्याचा अक्षय भिवशेत आणि चेन्नईच्या तौहिद अन्वर यांच्यात टक्कर झाल्यामुळे सुरक्षावाहनाला पाचारण करावे लागले. त्यानंतर पाचव्या आणि अखेरच्या लॅपमध्येही पुढे जाण्यासाठी संघर्ष पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी चितगांवच्या अफ्फान साफवानने तिसऱ्या स्थानासाठी गाझियाबादच्या अनमोल साहिलला आव्हान दिले. पण अनमोलने अफ्फानला वेळीच रोखत तिसरा क्रमांक पटकावला. या शर्यतीचे विजेतेपद हैदराबादच्या जीत जाबाखने तर दुसरा क्रमांक ध्रुवने पटकावला.

या मोसमात दमदार कामगिरी करत ध्रूवने विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडी घेतली होती. अखेरच्या दोन्ही शर्यतीत दमदार गुणांची कमाई करत ध्रुवने मोठय़ा फरकासह विजेतेपद आपल्या नावावर केले. सौरव आणि जीत यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस रंगली. मात्र ठाण्याच्या सौरव बंडोपाध्यायने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. जीतला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ज्युनियर अमियो चषक २०१८ स्पर्धेत शुभोमॉय बॉल याने तब्बल ९२ गुणांच्या फरकाने आपल्या प्रतिस्पध्र्याना मागे टाकत एकहातीपणे विजेतेपदावर नाव कोरले.