दक्षिण आफ्रिकेत रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतावर मात करत १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा जिंकण्याची बांगलादेश संघाची पहिलीच वेळ ठरली. कर्णधार अकबर अलीने संयमी खेळ करत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत संघाला विजय मिळवून दिला. या स्पर्धेनंतर सध्या सर्वत्र बांगलादेशच्या संघाचं कौतुक होताना दिसत आहे. मात्र बांगलादेशच्या या विजयात मुंबईचा माजी खेळाडू वासिम जाफरनेही महत्वाची भूमिका बजावली आहे.

बांगलादेशला विजयासाठी तुलनेने कमी धावांचं आव्हान होतं. मात्र फिरकीपटू रवी बिश्नोईने ४ बळी घेत बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडलं आणि सामन्यात रंगत आली. मात्र अकबर अलीने संथ खेळ करत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. अकबर अली, शाहदत हुसैन यासारखे बांगलादेशचे अनेक खेळाडू वासिम जाफरच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. (बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वासिम जाफरला आपल्या मिरपूर येखील Performance Academy मध्ये फलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका दिलेली आहे)

वासिम जाफरकडे बांगलादेशच्या तरुण खेळाडूंना फलंदाजी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी आहे

 

“भारताविरुद्ध सामन्यात अकबर एका वेगळ्याच फॉर्मात होता. अंतिम सामन्यात त्याने चांगला खेळ केला. याआधीही त्याने बांगलादेशकडून १४ आणि १६ वर्षाखालील संघाचं नेतृत्व केला आहे, आगामी काळात बांगलादेशच्या सिनीअर संघात त्याला कदाचीत संधी मिळू शकते. काळानुरुप तुम्ही काही गोष्टी शिकत जाता आणि त्यात तुमच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असेल तर ती तुमच्या खेळात दिसतेच”, द टेलिग्राफ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वासिम बांगलादेशी खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलत होता.

“मी यातील बहुतांश खेळाडूंना जवळून पाहिलं आहे. या स्पर्धेत त्यांनी बहुतांश महत्वाच्या संघाला नमवलं. अंतिम फेरीत भारत विजयाचा दावेदार मानला जात होता, पण त्यांनी भारतावरही मात केली. एक प्रशिक्षक या नात्याने मला याचा आनंद आहे.” अंतिम सामन्यात ३ गडी राखत बांगलादेशने भारतावर मात केली.