विदर्भ ५ बाद ७०२ धावा; सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम

इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा

शेष भारताविरुद्ध रणजी विजेत्या विदर्भाने इराणी चषक क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ५ बाद ७०२ धावांचा डोंगर उभारला. इराणी स्पर्धेच्या इतिहासातील शेष भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचा नवा विक्रम विदर्भाने साकारला आहे. द्विशतक साजरे करणाऱ्या वसीम जाफरचे त्रिशतक मात्र केवळ १४ धावांनी हुकले, तर अपूर्व वानखेडेने अर्धशतक ठोकले. शुक्रवारी अवकाळी पावसामुळे पहिले सत्र वाया गेले. अंधुक प्रकाशमुळे तब्बल तीन वेळा खेळ थांबवावा लागला.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मदानावर ३ बाद ५९८ धावांपासून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली. मात्र शुक्रवारी सकाळी अवकाळी पाऊस आल्याने पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला आणि दुपारी १२.४० वाजता म्हणजे उपाहारानंतर तब्बल साडेतीन तास उशिराने सामन्याला सुरुवात झाली. सामना सुरू होताच सिद्धार्थ कौलच्या एका षटकानंतर अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. १० मिनिटांच्या अवकाशानंतर परत खेळाला सुरुवात झाली. जाफर आपल्या त्रिशतकापासून केवळ १४ धावा दूर होता. सर्वानाच त्याच्या त्रिशतकाची उत्सुकता होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवशी १८ हजारांचा टप्पा गाठणाऱ्या आणि इराणी स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या जाफरला आज त्रिशतकाची सुवर्णसंधी होती. मात्र सिद्धार्थ कौलने त्यावर पाणी फेरले. सिद्धार्थच्या घातक माऱ्याने जाफरचा त्रिफळा उडाला. तिसऱ्या दिवशी जाफर केवळ एक धावेची भर घालून तंबूत परतला व त्याची ऐतिहासिक खेळी संपुष्टात आली. जाफरने ४३१ चेंडूंत ३४ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने २८६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चेंडू चांगलाच वळत होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे धावा काढताना फलंदाजांना कसरत करावी लागली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी ४४ धावांवर असलेल्या अपूर्वने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आलेल्या यष्टिरक्षक अक्षय वाडकरने अपूर्वला चांगली साथ दिली. अपूर्वला ६५ धावांवर जीवदान मिळाले. अपूर्वने मारलेला अप्रतिम फटका थेट गोलंदाज नदीमच्या दिशेने आला. मात्र त्याने तो झेल सोडला. अपूर्व आणि अक्षयने बऱ्यापैकी धावफलक हलता ठेवला, परंतु अर्धशतकाकडे वाटचाल करताना अक्षय ३७ धावांवर फिरकीपटू शाहबाज नदीमचा शिकार ठरला. फटका मारायच्या नादात अक्षयचा थेट झेल यष्टिरक्षक श्रीकर भरतच्या हातात गेला. अपूर्व आणि अक्षयने पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची मोलाची भागीदारी केली, तर दुसऱ्या बाजूने अपूर्वने चौफेर फटकेबाजी करत शतकाकडे वाटचाल केली. तिसऱ्या दिवसअखेर विदर्भाने ५ बाद ७०२ धावा केल्या. आदित्य सरवटे ४ तर अपूर्व ९९ धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक  

विदर्भ (पहिला डाव) : वसीम जाफर २८६, अपूर्व वानखेडे ९९ खेळत आहे, फैझ फझल ८९; सिद्धार्थ कौल २/९१)

विदर्भाचा नवा विक्रम

विदर्भाने प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धेत आज नोंदवलेल्या ७०२ धावांचा डोंगर हा सर्वोच्च ठरला. यापूर्वी विदर्भाने २०१४-१५ मध्ये याच मदानावर सौराष्ट्रविरुद्ध ९ बाद ५८३ धावा केल्या होत्या. तसेच इराणी करंडकात शेष भारताविरुद्ध कोणत्याही संघाचा सर्वाधिक धावांचा नवा विक्रम विदर्भाने नोंदवला. याआधी दिल्लीने ऑक्टोबर १९८० मध्ये नवी दिल्ली येथे ८ बाद ६२८ धावांवर डाव घोषित केला होता.