भारतीय संघाची धुरा संभाळत असताना कॅप्टन कूल म्हणून ओळला जाणारा महेंद्रसिंग धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. सामना जिंकला किंवा हारला तरी धोनी अनेकदा संयम बाळगतच मैदानात वावरतो हे अनेकदा दिसून आले आहे. मात्र कधीतरी धोनीचाही संयम सुटल्याचेही पहायला मिळाले आहे. काल सेंच्युरियन मैदानावर झालेल्या समान्यातही असेच काहीसे घडले आणि धोनी त्याच्याबरोबर फलंदाजी करणाऱ्या मनिष पांडेवर संतापला आणि संतापाच्या भरातच त्याने अपशब्द वापरले. याच घटनेचा व्हिडीओ सध्या ट्विटवर व्हायरल होत आहे.

धोनी आणि मनीष पांडेने ९८ धावांची नाबाद भागीदारी केली. भारतीय संघाला १८८च्या समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहचवण्यासाठी दोघांनीही शेवटच्या पाच षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. सुरवातीलाच भारताचा डाव गडगडल्याने डावाला आकार देण्याची जबाबादारी या दोघांवर होती त्यांनी ती पूर्णपणे निभावली. शेवटच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढत दोघे नाबाद राहिले. मात्र सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये धावा काढण्याचा दबाव दोन्ही फलंदाजांवर दिसून येत होता. यामधूनच धोनीच्या तोडून पांडेसाठी अपशब्द निघाले.

झाले असे की २०व्या षटकातील पहिल्या चेंडूंवर पांडेने एक धाव काढली आणि धोनी स्टाइकर्स एण्डला गेला. त्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार झाला तरी पांडे नॉन स्टाइकर्स एण्डला क्षेत्ररक्षक कुठे उभे आहेत हे पाहत होता. प्रत्येक धाव महत्वाची असणाऱ्या सामन्यातील अशा क्षणी पांडेने आपल्याकडे पहावे जेणेकरुन किती धावा पळायच्या आहेत किंवा इतर महत्वाचे संवाद त्याच्याबरोबर करता येईल असे धोनीला वाटत असल्याने त्याने थोड्या रागानेच पांडेला आपल्याकडे लक्ष देण्यास सांगितले. व्हायरल झालेल्या एका ट्विटमध्ये धोनी पांडेवर ओरडताना दिसत आहे. ‘ओए *@#*#!($&%# के इधर देख ले,उधर क्या देख रहा है. मै इधर खडा हू ना बॅटिंग कर रहा’ असे धोनी रागाने म्हणाला. नंतर या षटकामध्ये धोनीने सतरा धावा काढल्याने भारताने धावफलकावर १८८ धावांचा टप्पा गाठला. मात्र दोघांचीही ही खेळी भारताला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी न करता आल्याने आफ्रिकेने हा समाना आठ चेंडू बाकी असतानाचा विजय मिळवत मालिकेत १-१ बरोबरी केली.

धोनी अनेकदा स्टम्पच्या मागून गोलंदाजांना हिंदीमध्ये टिप्स देताना दिसतो. याच नाही तर प्रत्येक मालिकेमध्ये धोनीची स्टम्पमागील कॉमेन्ट्रीची समान्यानंतर नेटवर चर्चा होते. मात्र अशाप्रकारे संतापलेला धोनी पहिल्यांदाच स्टम्प माईकच्या सहाय्याने चाहत्यांना पाहायला मिळाला.