‘‘भारताची फलंदाजीची फळी मजबूत आहे, परंतु विश्वचषक जिंकण्यासाठी गोलंदाजीचा मारा सक्षम नाही. त्यामुळे २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे विश्वविजेतेपद टिकवणे भारताला कठीण जाणार आहे,’’ असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने व्यक्त केले आहे.
रणतुंगा या वेळी म्हणाला, ‘‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या युवा फलंदाजांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. परंतु परदेशी वातावरणात त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे. काही वर्षांपूर्वी मी रोहित शर्माला पाहिले, तेव्हा हा खेळाडू अजून कसोटी क्रिकेट का खेळत नाही, याचे आश्चर्य वाटले. तो एक गुणवान क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीही गुणी फलंदाज आहे. डावखुरा फलंदाज शिखर धवनसुद्धा चांगली फलंदाजी करतो. फलंदाजीकडे पाहता भारत निश्चितपणे आगामी विश्वचषक जिंकू शकतो, असे वाटते. पण भारताची गोलंदाजी झगडताना आढळत आहे.
तो पुढे म्हणाला, ‘‘भारताने परदेशात जाऊन सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. भारतीय उपखंडापेक्षा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची खरी अग्निपरीक्षा ठरेल. मायदेशात सामने जिंकणे हे महत्त्वाचे असते, परंतु परदेशी भूमीवर तुमची खरी कसोटी ठरते.’’
वादग्रस्त पंच पुनर्आढावा प्रक्रियेला (डीआरएस) रणतुंगाने पाठिंबा दिला आहे. तो म्हणाला, ‘‘डीआरएस पद्धत क्रिकेटमध्ये असावी, असे मला वाटते. फक्त ती अधिक सुधारित स्वरूपात असावी. काही मंडळी म्हणतात, ते १०० टक्के योग्य नाही. परंतु डीआरएस काही टक्के तरी योग्य आहे. जर एखाद्याने चुकीचा निर्णय दिला, तर काही टक्के तरी त्यात सुधारणा व्हायला वाव आहे. गेल्या २०-३० वर्षांमध्ये क्रिकेटमधील ती सर्वात चांगली गोष्ट आहे.’’
एकदिवसीय क्रिकेटमधील नव्या नियमांवरही या वेळी रणतुंगा यांनी तोफ डागली. ते म्हणाले, ‘‘बऱ्याच मंडळींच्या मते ते खेळासाठी चांगले आहे, पण माझे मत वेगळे आहे. क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु हे प्रमाण ६०:४० असायला हवे किंवा ५०:५० असावे. अन्यथा गोलंदाज संपवले जातील. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये हेच होते आहे.’’
१९९६मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाने प्रथम विश्वविजेतेपद जिंकण्याची किमया साधली होती. त्या वेळी त्यांना सरकारने भूखंड इनाम म्हणून दिला होता. आता याच भूखंडावर क्रिकेटच्या संकल्पनेवर आधारित एक आलिशान निवासी संकुल बांधण्याची योजना आखली आहे. यासाठी विल्स रिअल्टर्स ही कंपनी या विश्वविजेत्यांनी स्थापन केली आहे.
गुरुवारी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये रणतुंगा, सनथ जयसूर्या, चामिंडा वास, रोमेश कालुवितरणा आणि रवींद्र पुष्पकुमारा या खेळाडूंनी आपल्या या उपक्रमाची सर्वाना माहिती दिली. या उपक्रमातून मिळणारा नफा श्रीलंकेतील शालेय क्रिकेटच्या विकासासाठी आणि आर्थिक अडचणींशी सामना करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंकरिता वापरण्यात येणार आहे, असे रणतुंगा यांनी सांगितले.