भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये रंगणारे क्रिकेट सामने हे नेहमी रंगतात. प्रसारमाध्यमंही या सामन्यांना एखाद्या युद्धाचं स्वरुप देतात. मैदानावर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये रंगणारं द्वंद्व सर्वांना माहिती आहे. माजी गोलंदाज शोएब अख्तर आपल्या काळात भारतीय फलंदाजांना डिवचण्यासाठी ओळखला जायचा. हरभजन सिंह, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यासारख्या खेळाडूंचे पाक खेळाडूंसोबत नेहमी खटके उडायचे. अशाच एका सामन्यात हरभजन सिंह आणि शोएब अख्तरमध्ये झालेल्या वादानंतर शोएब अख्तर हरभजनला मारण्यासाठी त्याच्या हॉटेल रुमवर गेला होता. काही दिवसांपूर्वी Hello App ला दिलेल्या मुलाखतीत शोएबने हे वक्तव्य केलं आहे.

२०१० साली घडलेल्या त्या किस्स्याबद्दल शोएब अख्तरने माहिती दिली. “मी हरभजनला शोधत त्याच्यासोबत भांडण्यासाठी हॉटेल रुमवर गेलो होतो. मी त्या दिवशी त्याला मारणारच होतो. तो आमच्यासोबत राहिलेला आहे, आम्ही एकत्र जेवलोय, लाहोरमध्ये फिरलोय…आमची संस्कृती एक आहे. तो माझ्या छोट्या भावासारखा आहे तरीही तो माझ्याशी असा वागतो म्हणून मला राग आला होता. तो हॉटेल रुमवर सापडेल असं मला वाटलं होतं, पण तो तिकडे नव्हता. त्याला कदाचीत समजलं असावं की मी येणार आहे. पण दुसऱ्या दिवशी त्याने माझी माफी मागितली मग माझा राग शांत झाला.”

श्रीलंकेत २०१० साली झालेल्या आशिया चषकादारम्यान हरभजन आणि शोएब यांच्यात वाद रंगला होता. मात्र यानंतर दोघांनीही तो प्रसंग विसरुन आपली मैत्री कायम ठेवली आहे. सध्या जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभा करण्यासाठी भारत विरुद्ध पाक मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. परंतू भारतीय खेळाडूंनी या पर्यायाला विरोध दर्शवला होता.

अवश्य वाचा – विरेंद्र सेहवाग खोटारडा माणूस आहे – शोएब अख्तर