प्रशिक्षक सिमन्स यांचा विंडीजच्या गोलंदाजांना सल्ला

हैदराबाद : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजी करताना गोलंदाजांनी अतिरिक्त दडपण घेतल्यास त्याला बाद करणे कठीण होईल. त्यामुळे त्यांनी दडपण झुगारून आक्रमकरीत्या गोलंदाजी करावी, असा सल्ला वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी बुधवारी दिला. परंतु कोहलीला लवकरात लवकर बाद करणे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे, असेही सिमन्स यांनी सांगितले.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला हैदराबाद येथे ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर सिमन्स यांनी कोहलीला बाद करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

‘‘कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध नेहमीच धावांचा रतीब रचला आहे. गेल्या वर्षी ज्या वेळी आम्ही भारत दौऱ्यावर आलो होतो, तेव्हा त्याने एकदिवसीय सामन्यांत तीन सलग शतके झळकावली होती. त्याशिवाय ट्वेन्टी-२० मध्येही विंडीजविरुद्धची त्याची सरासरी कमाल आहे. परंतु गोलंदाजांनी कोहलीला घाबरून अथवा त्याचे अतिरिक्त दडपण घेऊन गोलंदाजी केल्यास ते कधीच त्याला बाद करू शकणार नाहीत,’’ असे ५६ वर्षीय सिमन्स म्हणाले.

कोहलीला बाद करण्याच्या काही योजना आखल्या आहेत का, याविषयी विचारले असता सिमन्स म्हणाले, ‘‘कोहलीला माघारी पाठवण्याच्या आम्ही अनेक युक्त्या शोधल्या आहेत. एक म्हणजे आम्ही त्याला बॅटऐवजी यष्टी पकडून फलंदाजी करण्यास सांगू. त्याशिवाय मालिका सुरू होण्यापूर्वीच कागदी करार करून कोहलीला ट्वेन्टी-२० ऐवजी एकदिवसीय मालिकेत शतक झळकावण्याची संधी देऊ आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा पर्याय म्हणजे आमच्या गोलंदाजांनी रणनीतीनुसार गोलंदाजी केली, तर आम्ही त्याला नक्कीच लवकर बाद करू शकतो. मात्र विंडीजकडे उदयोन्मुख आणि अनुभवी गोलंदाजांचा भरणा असून ते या मालिकेत कोहलीवर वर्चस्व गाजवण्यासाठी उत्सुक आहेत,’’ असेही सिमन्स   यांनी सांगितले.