भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीचा पहिला दिवस गाजवला तो मुंबईचा तरुण खेळाडू पृथ्वी शॉने. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या पृथ्वीने शतकी खेळीची नोंद करत अनेक विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली. १३४ धावा काढल्यानंतर पृथ्वी शॉ देवेंद्र बिशुच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. या खेळीदरम्यान पृथ्वीने तब्बल ९ विक्रमांची नोंद केली.

० – पृथ्वी शॉचा अपवाद वगळता एकाही तरुण भारतीय फलंदाजाने याआधी कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात केली नव्हती. कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू हा विक्रम पृथ्वीने आपल्या नावे केला आहे.

१ – कसोटी क्रिकेट पदार्पणामध्ये शतक झळकावणारा पृथ्वी शॉ पहिला तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे. याचसोबत पदार्पणात अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही पृथ्वीच्या नावे जमा झाला आहे.

२ – पृथ्वी शॉ भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिनने वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधलं पहिलं शतक झळकावलं होतं.

३ – पृथ्वी शॉने ९९ चेंडुंमध्ये शतक साजरं केलं. कसोटी पदार्पणात सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पृथ्वीची ही खेळी तिसऱ्या क्रमांकावर आलेली आहे. शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ साली मोहाली कसोटीत ८५ चेंडूत शतक झळकावलं होतं. याव्यतिरीक्त ड्वेन स्मिथ हा खेळाडूही शॉच्या पुढे आहे.

४ – कसोटी क्रिकेटच्या पदार्पणात शतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंच्या यादीत पृथ्वी शॉ चौथ्या स्थानावर. आर्ची जॅक्सन या खेळाडूने पहिल्याच कसोटीत १६४ धावा पटकावल्या होत्या.

४ – भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तरुण खेळाडूंच्या यादीत पृथ्वी शॉ चौथ्या स्थानावर. या यादीमध्ये सचिन पहिल्या स्थानावर आहे.

१० – कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ दहावा तरुण खेळाडू ठरला आहे.

१३ – भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पृथ्वी शॉ तेरावा भारतीय खेळाडू ठरला आहे.

१५ – कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ पंधरावा भारतीय खेळाडू ठरला आहे.