पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर, आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये अशी मागणी होऊ लागली होती. मात्र पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळायचा की नाही याचा निर्णय बीसीसीआयने घ्यायचा आहे, असं वक्तव्य फिरकीपटू युजवेंद्र चहलने केलं आहे. तो एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.

अवश्य वाचा – भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी – सौरव गांगुली

“पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळायचा की नाही हे आमच्या हातात नाही. जर बीसीसीआयने सामना खेळण्याचा निर्णय घेतला तर आम्ही खेळू, जर त्यांनी नाही खेळण्याचा निर्णय घेतला तर आम्ही नाही खेळणार. मात्र या सर्व गोष्टींवर काहीतरी ठोस उपाय शोधण्याची वेळ आलेली आहे. पाकिस्तानातले सर्व लोकं हे अतिरेकी आहेत असं माझं म्हणणं नाही, मात्र हल्ल्यासाठी जी लोकं जबाबदार आहेत त्यांना शिक्षा मिळायलाच हवी.” चहल पत्रकार परिषदेत बोलत होता.

अवश्य वाचा – पाकविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा भारताला पूर्णपणे अधिकार – शोएब अख्तर

24 फेब्रुवारीपासून भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाशी 2 टी-20 आणि 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ 16 जून रोजी समोरासमोर येणार आहेत. वेळापत्रकात कोणताही बदल झाला नसल्याचं आयसीसीने याआधीच स्पष्ट केलं आहे, त्यामुळे विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्याबद्दल बीसीसीआय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – पाकची कोंडी करणं भारताला पडलं महागात, IOC चा भारताला दणका