अ‍ॅशेस मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया संघावर ‘सर्वात वाईट संघ’ अशी टीका होत आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने सांगितले की, आम्ही आमच्या कामगिरीच्या जोरावर टीकाकारांना चुकीचे ठरवू आणि मायदेशी रिक्त हस्ते परतणार नाही.
बुधवारी अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या १६ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिज येथे १० जुलैपासून होणार आहे. संघ जाहीर झाल्यावर साऱ्याच ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी संघ निवडीवर ताशेरे ओढले.
‘डेली मेल’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, ‘‘आतापर्यंत अ‍ॅशेससाठी निवडला गेलेला हा सर्वात वाईट संघ आहे. हा खरेच ऑस्ट्रेलियाचा संघ आहे का? ’’
भारतातील ४-० अशा पराभवानंतर ही प्रतिक्रिया येणे स्वाभाविक असल्याचे क्लार्कला वाटते. तो म्हणाला की, ‘‘संघ निवडीवरील प्रतिक्रियेने मला आश्चर्य वाटले नाही. ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी ‘अ‍ॅशेससाठी निवडला गेलेला सर्वात वाईट संघ’ अशी उपमा दिली आहे, पण कर्णधारपद भूषवताना बऱ्याच वेळा अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. पण टीकाकारांना आम्ही चुकीचे नक्कीच ठरवू.’’
तो पुढे म्हणाला की, ‘‘ग्लेन मॅकग्रा आम्ही ५-० अशा फरकाने मालिका जिंकू असे म्हणायचा, तसे मी म्हणणार नाही. पण मला विश्वास आहे की, जर आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो तर नक्कीच रिकाम्या हाती परतणार नाही.’’