आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या अनुपस्थितीत गचीबोली स्टेडियमवर सोमवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद सांघिक बॅडमिंटन स्पध्रेत भारतीय महिला संघासमोरील आव्हान खडतर असेल.
सायनाशिवाय खेळणाऱ्या भारताची एकेरीत पी. व्ही. सिंधूवर मदार असेल, तर दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा धुरा सांभाळतील. भारतीय महिला संघाच्या गटात जपान आणि सिंगापूरचा समावेश आहे. सिंधू, रुत्विका शिवानी गद्दे, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, मनीषा के, सिक्की रेड्डी, पी. सी. तुलसी व आरती सारा सुनील यांचा भारतीय संघात समावेश आहे.
पायाच्या दुखापतीतून सावरत असलेल्या जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील सायनाने आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतून माघार घेतली आहे. सायना सय्यद मोदी ग्रां. प्रि. गोल्ड आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेतही खेळली नाही.
‘‘युवा खेळाडू जबाबदारीने खेळतील. ज्वाला आणि अश्विनीसारखे अनुभवी खेळाडू संघात आहेत. संघ म्हणून प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे,’’ अशी प्रतिक्रिया भारताचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केली.
पुरुष विभागात भारताच्या गटात चीन आणि सिंगापूरचा समावेश आहे. मात्र लिन डॅन, चेन लाँग (चीन)
आणि ली चाँग वेई (मलेशिया) हे दिग्गज बॅडमिंटनपटू खेळत
नसल्यामुळे भारताच्या आशा उंचावल्या आहेत. भारतीय संघात किदम्बी श्रीकांत, अजय जयराम आणि एच. एस. प्रणॉय भारतीय आव्हानाची धुरा सांभाळतील. याशिवाय परुपल्ली कश्यप, मनू अत्री, सुमीत रेड्डी, प्रणव जेरी, चोप्रा, अक्षय देवलकर, सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांचा भारतीय संघात समावेश आहे.