महिला चॅलेंज क्रिकेट स्पर्धा

गतविजेत्या सुपरनोव्हाजला महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेत शनिवारी ट्रेलब्लेझर्सविरुद्ध मोठा विजय गरजेचा आहे. याउलट स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्सचेही सलग दुसऱ्या विजयासह अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय आहे.

व्हेलोसिटीचा गुरुवारी ९ गडी राखून मोठय़ा फरकाने पराभव केल्याने ट्रेलब्लेझर्सचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. व्हेलोसिटीला अवघ्या ४७ धावांमध्ये गुंडाळून ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजांनी चमक दाखवली. इंग्लंडची फिरकीपटू सोफी एस्सेलस्टोनने चार गडी बाद करत चमकदार कामगिरी केली. सध्या सोफी महिलांच्या जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीत गोलंदाजांमध्ये अग्रस्थानी आहे. हरमनप्रीत कौर,चमरी अटापट्टूसह सुपरनोव्हाजच्या फलंदाजांना सोफीची फिरकी खेळून काढण्याचे आव्हान आहे. जोडीला राजेश्वरी गायकवाड आणि अनुभवी झुलन गोस्वामी यांची गोलंदाजीही ट्रेलब्लेझर्सची ताकद आहे. सुपरनोव्हाजला मोठय़ा धावगतीसह विजय आवश्यक आहे. याउलट सुपरनोव्हाज पराभूत होण्याची अपेक्षा व्हेलोसिटीला असेल.

सुपरनोव्हाजचा स्पर्धेतील पहिल्याच लढतीत व्हेलोसिटीकडून पराभव झाला होता. आणखी एक पराभव म्हणजे सुपरनोव्हाजचा अंतिम फेरीचा मार्ग बंद करण्यासारखे आहे.

* वेळ : सायं. ७:३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या