|| मिलिंद ढमढेरे

हॉकीसारख्या सांघिक क्रीडा प्रकारात गोल करण्यासाठी हुकमी संधी फारच क्वचित मिळतात. या संधींचे सोने केले नाही तर मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागतो. हेच भारतीय महिला संघाबाबत दिसून आले. लंडन येथे सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. दुर्दैवाने क्षमता असून व आव्हान फारसे कठीण नसतानाही भारतीय संघाने आत्मविश्वासाचा अभाव दाखवत पराभव ओढवून घेतला.

भारतीय संघासाठी ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची होती. याच महिन्याच्या अखेरीस आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. तसेच आणखी दोन वर्षांनी टोकियो येथे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही होत आहे. या दोन्ही स्पर्धासाठी विश्वचषक स्पर्धा रंगीत तालीम होती. साखळी गटात भारताला एकही सामना जिंकता आला नाही. या गटात इंग्लंड व अमेरिका या दोन्ही संघांविरुद्धच्या लढती त्यांनी बरोबरीत सोडवल्या. आर्यलडविरुद्ध त्यांना ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला. या तिन्ही साखळी सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सातत्याचा अभाव दिसून आला. त्याचप्रमाणे विजय मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जिद्द, सांघिक कामगिरी व आत्मविश्वास याचा अभाव त्यांनी दाखवला. अमेरिकेविरुद्ध बरोबरी करीत निदान त्यांनी बाद फेरीत स्थान मिळवले. बाद फेरीत इटलीविरुद्ध त्यांनी ३-० असा सफाईदार विजय मिळवत अपेक्षा उंचावल्या होत्या. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी धारदार आक्रमण केले. त्यांचा बचावही भक्कम होता. या सामन्यातील त्यांचे कौशल्य लक्षात घेतल्यावर ते उपांत्यपूर्व फेरीत आयरिश संघाला सहज हरवतील असा अंदाज होता. परंतु गोलशून्य बरोबरीत सामना संपल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय खेळाडूंनी हाराकिरी पत्करली. या सामन्यात त्यांना गोल करण्यासाठी मिळालेल्या संधींचा लाभ घेता आला नाही. पेनल्टी शूटआऊटमध्ये थेट फटका मारता येत नाही. त्याऐवजी गोलरक्षकास पुढे खेचून व त्याला चकवत गोलमध्ये चेंडू तटवण्यासाठी सर्वोच्च शैलीची गरज असते. याबाबत भारताची कर्णधार राणी रामपालसह पहिल्या तीन खेळाडूंनी या संधी दवडल्या व पराभव ओढवून घेतला.

भारतीय खेळाडूंना परदेशातील स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळत नाही, अशी एके काळी तक्रार केली जात असे. पण गेल्या सहा-सात वर्षांमध्ये भारतीय महिला हॉकीपटूंनाही भरपूर सवलती मिळत आहेत. परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळावा, यासाठी विविध देशांमधील निमंत्रित स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी त्यांना मिळत असते. संघातील खेळाडूंचाही एकत्रित सराव होत असतो. खेळाडूंना आर्थिक उत्पन्नाचीही हमी मिळत आहे. त्याचप्रमाणे परदेशी प्रशिक्षक, फिजिओ, ट्रेनर, वैद्यकीय तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ आदी सर्व प्रकारच्या सुविधा पायाशी लोळण घेत असताना खेळाडूंनी सर्वोत्तम कौशल्य दाखवण्याची गरज असते. मात्र आपल्या खेळाडूंनी अपेक्षाभंग केला. जागतिक क्रमवारीची तुलना केली, तर आयरिश संघाचा आपल्यापेक्षा खालचा क्रमांक आहे. त्याचप्रमाणे उपांत्य फेरीत आर्यलड संघाविरुद्ध खेळणारा स्पेनच्या संघापेक्षाही भारताचे स्थान वरचे आहे. जर भारतीय खेळाडूंनी विजेतेपद जिंकण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत खेळ केला असता, तर केवळ आर्यलड नव्हे, तर उपांत्य फेरीतील लढतही त्यांनी जिंकली असती.

भारताला या स्पर्धेत पेनल्टी कॉर्नरसहित २० वेळा गोल करण्याच्या संधी मिळाल्या. त्यापैकी केवळ तीन संधींचा त्यांनी लाभ घेतला. हे प्रमाण लक्षात घेतले, तर आपले खेळाडू गोल करण्याच्या अचूकतेमध्ये किती कमकुवत आहेत याचा अंदाज येऊ शकतो. पेनल्टी कॉर्नरवर थेट फटका मारून गोल करता येत नसेल, तर दोन-तीन खेळाडूंनी एकमेकांकडे पास देत गोल करणे अधिक सोपे असते. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड्स आदी देशांच्या खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंनी याबाबत तंत्र शिकण्याची गरज आहे. या स्पर्धेतील पराभवाचे खापर संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरीन यांच्यावर टाकून आपले संघटक आपली जबाबदारी झटकतील. मात्र प्रशिक्षकांमध्ये कितीही वेळा बदल झाला, तरी मूळच्या चुका जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे भारतीय खेळाडू महत्त्वाच्या क्षणी हाराकिरीच करीत राहणार आहेत. त्यामुळेच की काय गेल्या ४३ वर्षांमध्ये भारतीय संघास पुरुष व महिला विभागात विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ असूनही असे विदारक चित्र भारतीय खेळाडूंकडून पाहायला मिळत आहे. यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते!

milind.dhamdhere@expressindia.com