भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि गतविजेत्या पी. व्ही. सिंधुने ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केला आहे. सिंधुने पहिल्या फेरीत मलेशियाच्या सोनिया चीहचा 21-11, 21-17 असा पराभव केला. मात्र, भारताची फुलराणी सायना नेहवाल पहिल्याच फेरीत गारद झाली. तिला सातव्या सीडेड स्वित्झर्लंडच्या मिया ब्लिडफेल्टविरुद्धच्या सामन्यात रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर व्हावे लागले. या सामन्यात ती 8-21, 4-10 अशी पिछाडीवर होती.

श्रीकांतचाही पराभव

पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतलाही पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तो याच्याकडून 11-21, 21-15, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. तर, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, समीर वर्मा आणि बी साई प्रणीत यांनी दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

पहिल्या फेरीत प्रणॉयने मलेशियाच्या डॅरेन लव्हचा 21-10 21-10 असा पराभव केला. आता पुढच्या फेरीत त्याचा सामना जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू जपानच्या केंटो मोमोटाशी होईल. तर, लक्ष्य सेनने थायलंडच्या कांताफोन वांगचॉरेनचा 21-18, 21-12 तर प्रणीतने फ्रान्सच्या टोमा पोपोव्हचा 21-18, 21-12 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. समीरने ब्राझीलच्या यॉर्गा कोल्होवर 21-11, 21-19 असा विजय मिळवला.

पुरुष दुहेरीत रंकिरेड्डी-शेट्टी जोडीची आगेकूच

पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने निखार गर्ग आणि अनिरुद्ध मयेकर या इंडो-इंग्लिश जोडीचा 21-7, 21-10 असा पराभव करत पुढच्या फेरीत स्थान मिळवले.

इंडोनेशिया संघाची माघार

इंडोनेशियाच्या बॅडमिंटन संघाने  त्यांच्या फ्लाइटमधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्यानंतर ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) आणि बॅडमिंटन इंग्लंड यांनी ही माहिती दिली. हा संघ स्पर्धेच्या प्रवासापासून 10 दिवसांसाठी क्वारंटाइन कालावधीमध्ये आहे.