उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी ब्राझील-जर्मनी यांच्यात चुरस

ब्राझील आणि जर्मनी या दोन बलाढय़ संघांमध्ये फुटबॉलचा सामना म्हणजे दर्दी चाहत्यांसाठी पर्वणीच. तीन वर्षांपूर्वी झालेल्या वरिष्ठ विश्वचषक स्पर्धेत विजेत्या जर्मनीने उपांत्य फेरीत ब्राझीलचा ७-१ असा धुव्वा उडवला होता. त्याची परतफेड करताना नेयमारच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर ब्राझीलने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जर्मनीवर मात करून सुवर्णपदक जिंकले. या आठवणंीची उजळणी करण्याचे कारण की, युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत उभय संघ एकमेकांसमोर उभे आहेत. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी १९७७ च्या कोलकाता दौऱ्यात येथील फुटबॉल चाहत्यांना आपलेसे केले. त्यांची ती मोहिनी आजही येथील नागरिकांवर आहे आणि त्यामुळेच रविवारी होणाऱ्या या लढतीत प्रेक्षकांचा संपूर्ण पािठबा ब्राझीलला असणार आहे.

कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवरील उत्कंठापूर्ण लढतीचे साक्षीदार होण्यासाठी चढाओढ सुरू आहे आणि ६० हजारांहून अधिक प्रेक्षक या सामन्याला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. याआधी या स्टेडियमवर लिओनेल मेस्सीच्या अर्जेटिना आणि व्हेनेझुएला यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला होता. त्यालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. जर्मनीने वरिष्ठ गटात पाच विश्वविजेतेपद पटकावले असले तरी युवा गटात त्यांच्या नावावर एकही जेतेपद नाही. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीच्या या लढतीत ते संपूर्ण ताकदीने ब्राझीलचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. १९८५च्या पहिल्या युवा विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद ही त्यांची  सर्वोत्तम कामगिरी आहे.

जर्मनीचा संघ कागदावर तरी ब्राझीलच्या खेळाची बरोबरी करताना दिसत नाही. ब्राझीलच्या या संघाने २०१५च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत ७५ पैकी ४७ सामन्यांत विजयही मिळवले आहेत आणि युवा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक १६६ गोल त्यांच्या नावावर आहेत. त्यामुळे कार्लोस अमाडेयू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा ब्राझीलचा संघ या लढतीत विजयाचा दावेदार आहे. त्यात जर्मनीला साखळी फेरीत दुबळ्या इराणकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण खेळ केला खरा, परंतु ब्राझीलचा सामना करण्यासाठी त्यांना खेळात  सुधारणा करावी लागणार आहे.

जर्मनीचा प्रमुख खेळाडू डेनीस जॅस्ट्रझेंबस्कीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि मध्यरक्षक यानिक केईटेल, सॅहव्हेर्दी केटीन आणि निकोलस कुएन्ह हे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे उर्वरित खेळाडूंमध्ये आक्रमणाची धार अधिक तीव्र करण्याचे आव्हान प्रशिक्षक ख्रिस्टियन व्युएक्स यांना पेलावे लागणार आहे. डेनीस, जॉन येबोआह आणि कर्णधार जॅन-फिएट अर्प या त्रिकुटाने उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियावर ४-० असा विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे डेनीसच्या अनुपस्थितीत अर्प व येबोआहवरील जबाबदारी वाढली आहे. त्यात ब्राझीलचा गोलरक्षक गॅब्रिएल ब्रझाओ याच्या विरोधात प्रतिस्पर्धी संघांना केवळ एकच गोल करता आलेला आहे आणि ही मजबूत बचावभिंत ओलांडण्याचे आव्हानही जर्मनीच्या आक्रमणपटूंसमोर आहे.  ब्रेनर आणि लिंकोन हे ब्राझीलचे प्रमुख खेळाडू आहेत आणि त्यांच्या नावे प्रत्येकी तीन गोल आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा बचाव खिळखिळीत करण्याचे कौशल्य या खेळाडूंकडे आहे. त्यात अ‍ॅलनकडून योग्य साथ मिळत असल्याने त्यांना गोल करणे अधिक सोपे जात आहे. अ‍ॅलनला आपल्या चमूत घेण्यासाठी युरोपियन क्लबमध्ये चढाओढ सुरू आहे.

 

जोकीम लोव यांचा प्रेरणादायी संदेश

जर्मनीला २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेचे आणि २०१७ च्या कॉन्फेडरेशन चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावून देणारे मार्गदर्शक जोकीम लोव यांनीही रविवारी होणाऱ्या युवा विश्वचषक स्पर्धेतील लढतीबाबत उत्सुकता प्रकट केली आहे. त्यांनी खेळाडूंसाठी प्रेरणादायी संदेश पाठवला आहे आणि त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारतात तुमची कामगिरी कशी होते, याबाबत मला उत्सुकता आहे. ब्राझीलविरुद्धची लढत मी पाहणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

 

०६
उभय संघांतील सहा लढतींत ब्राझीलने ३ विजय मिळवले आहेत, तर एक लढत अनिर्णीत राहिली. जर्मनीला दोन विजय मिळवण्यात यश आले आहे.

२३
या सहा लढतींमध्ये एकूण २३ गोल्सचा पाऊस पडला आणि त्यात सर्वाधिक १५ गोल ब्राझीलच्या नावावर आहेत.

उपांत्यपूर्व फेरी

जर्मनी वि. ब्राझील
स्थळ : विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, कोलकाता

स्पेनच्या मार्गात दृढनिश्चयी इराणचा अडथळा

कोची : जर्मनीसारख्या बलाढय़ संघालाही पराभवाची चव चाखायला लावणारा इराणचा संघ ऐतिहासिक कामिगिरीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत खेळणाऱ्या या संघासमोर जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या स्पेनचे आव्हान आहे. कोची येथील जवाहरलाल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत होणार आहे.

या लढतीत तीन वेळा उपविजेते ठरलेल्या स्पेनचे पारडे जड मानले जात आहे. असे असले तरी दृढनिश्चयाने खेळणाऱ्या इराणला रोखणे त्यांना सोपे जाणार नाही. स्पेनने उपउपांत्यपूर्व फेरीत युरोपातील बलाढय़ संघ फ्रान्सला नमवून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. कर्णधार अ‍ॅबले रुईझवर अपेक्षांचा भार असणार आहे. त्याने १७ वर्षांखालील वयोगटात स्पेनकडून सर्वाधिक २१ गोल करण्याचा विक्रम नावावर केला आहे. त्याच्यासोबतीला ज्युआन मिरांडा, फेरान टोरेस, सेर्गिओ गोमेझ आणि अँटोनिया ब्लँको हे इराणची बचाव फळी भेदण्यासाठी सज्ज आहेत.  दुसरीकडे इराणने साखळी फेरीत जर्मनीला नमवून सर्वाचे लक्ष आकर्षित केले. त्यांनी चार सामन्यांत १२ गोल केले आहेत आणि केवळ दोन गोल खाल्ले आहेत. त्यामुळे आक्रमणाबरोबर त्यांच्या बचावपटूंची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. स्पेनच्या धारदार आक्रमणाचा ते कसा सामना करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. स्पेनचे प्रशिक्षक सँटीयागो डेनिया यांनी इराणच्या संघाची सर्वोत्तम संघ म्हणून प्रशंसा केली.

उपांत्यपूर्व फेरी

स्पेन वि. इराण

स्थळ : जवाहरलाल नेहरु स्टेडियम, कोची