श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता असा आरोप केला होता. या आरोपांनंतर श्रीलंकन क्रिकेटमध्ये वादळ निर्माण झालं होतं. लंकेच्या तत्कालीन संघातील कर्णधार कुमार संगकारा आणि महत्वाचा खेळाडू महेला जयवर्धने यांनी अलुथगमगे यांचे आरोप फेटाळून लावत, पुरावे सादर करण्याची मागणी केली होती. श्रीलंकन सरकारनेही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अलुथगमगे यांनी केलेल्या आरोपांविषयी चौकशी सुरु केली. मात्र पुरेशा पुराव्याअभावी श्रीलंकन पोलिसांना हा तपास बंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एएफपीशी बोलताना दिली.

कुमार संगाकारा, महेला जयवर्धने, उपुल थरंगा आणि तत्कालीन निवड समिती अध्यक्ष अरविंदा डी सिल्वा यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर श्रीलंकन पोलिसांनी हा तपास सबळ पुरावे नसल्याने बंद केला. “सर्व खेळाडूंची दीर्घकाळ चौकशी करण्यात आली. आम्ही त्यांच्या स्पष्टीकरणावर समाधानी आहोत. आम्ही या प्रकरणाचा तपास बंद करत आहोत. अंतिम सामन्यात आयत्या वेळी करण्यात आलेल्या बदलाबाबत साऱ्यांनी पटेल असे स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या तपासात आम्हाला कोणत्याही प्रकारच्या फिक्सिंगचे धागेदोरे आढळले नाहीत”, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

श्रीलंकेच्या पोलिसांनी श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा, सलामीवीर उपुल थरंगा आणि अरविंदा डी सिल्वा यांची चौकशी केल्यानंतर संघातील आणखी एक महत्वाचा खेळाडू महेला जयवर्धनेचीही चौकशी केली. कोलंबो येथील सुगथदास मैदानातील क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास पथकासमोर जयवर्धने चौकशीसाठी हजर राहिला होता. या संदर्भात त्याने आपलं म्हणणं पथकासमोर मांडलं. गुरुवारी कुमार संगकाराची चौकशी होत असताना मैदानाबाहेर श्रीलंकेतील राजकीय कार्यकर्ते व चाहत्यांनी निदर्शने केली होती. त्यामुळे माजी क्रीडामंत्र्यांनी केलेल्या आरोपाला हळूहळू राजकीय रंग चढताना पहायला मिळाला होता. पण या प्रकरणी पुरावे नसल्यामुळे अखेर शुक्रवारी हा तपास थांबवण्यात आला.